

जालना : जिल्हा परिषद जालन्याचा सन 2025-26 चा सुधारित व 2026-27 चा मूळ अर्थसंकल्प मंगळवार, दि. 24 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सादर करण्यात आला. प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात एकूण 22 कोटी 55 लाख 20 हजार रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असून 22 कोटी 55 लाख 07 हजार खर्च प्रस्तावित आहे. त्यामुळे अर्थसंकल्प ‘सरप्लस’ ठरला आहे.
शासनाच्या 14 फेब्रुवारी 2024 च्या निर्णयानुसार निधी ‘ व्हीपीडीए’ मध्ये जमा करण्याच्या पद्धतीमुळे व्याज उत्पन्न बंद झाले असून महसुलात सुमारे 50 ते 60 टक्के घट झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. या पार्श्वभूमीवर खर्चावर नियंत्रण आणि उत्पन्नवाढीच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला आहे.
बांधकाम विभागामार्फत पे ॲण्ड पार्किंग, रुफ टॉप रेस्टॉरंट यांसारखे उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी, आरोग्य, शिक्षण व पशुसंवर्धन विभागांमार्फत विविध शुल्क, प्रशिक्षण आणि प्रकल्पांद्वारे उत्पन्न वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे सुमारे 90 ते 100 लाख रुपयांची अतिरिक्त महसूलवाढ अपेक्षित आहे.
शिक्षण, आरोग्य, महिला-बालकल्याण आणि दिव्यांग कल्याण या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून ग्रामीण भागाच्या गरजांनुसार निधीचे वाटप करण्यात आले आहे. पंचायत राज अभियान, सिंचन, कृषी विकास आणि सामाजिक योजनांवरही भर देण्यात आला आहे.
एकूणच, आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवरही नियोजनबद्ध खर्च, उत्पन्नवाढ आणि नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसून येत आहे.