

जाफराबाद : भोकरदन रोडवरील आयटीआय कॉलेज गेटजवळ मिरची वाहतूक करणाऱ्या भरधाव आयशरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना रविवार, दि. १३ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजेच्या दरम्यान घडली. या अपघातात दुचाकीस्वार यशवंत श्रीराम पेंढारकर (वय ५९ वर्षे) यांचा मृत्यू झाला.
यशवंत पेंढारकर हे जाफराबाद येथील आपल्या घरून एमएच २१ यू ८२५८ क्रमांकाच्या दुचाकीवरून सायंकाळी सुमारे ६ वाजता अष्टविनायक नगर येथे फिरण्यासाठी गेले होते. फिरून झाल्यानंतर ते दुचाकीवरून घरी परतत असताना आयटीआय कॉलेज गेटजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डब्ल्यूबी २५ झेड ३१७४ क्रमांकाच्या मिरची वाहतूक करणाऱ्या आयशरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
धडकेनंतर दुचाकी काही अंतरापर्यंत घसरत गेली. अपघातात यशवंत पेंढारकर गंभीर जखमी झाले. उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक वसुदेव पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून पुढील कारवाई सुरू आहे.
पंधरा दिवसांत दुसरा बळी
जाफराबाद-भोकरदन मार्गावर मिरची वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनांमुळे अपघातांची मालिका सुरू असल्याचे या घटनेनंतर पुन्हा समोर आले आहे. गेल्या पंधरा दिवसांत मिरची वाहतूक करणाऱ्या आयशरचा हा दुसरा बळी आहे. यापूर्वी जवखेडा फाट्याजवळ मिरची वाहतूक करणाऱ्या आयशरने तीनचाकी ॲपेला धडक दिली होती. या अपघातात ॲपे चालक संदीप जगताप यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता आयटीआय कॉलेज गेटजवळ झालेल्या अपघातात यशवंत पेंढारकर यांचा मृत्यू झाल्याने या मार्गावरील वाढत्या मिरची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वेगावर आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.