

It is necessary to understand the limitations of quantum computers
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : क्वांटम संगणकांच्या मर्यादा असल्या तरी औषधनिर्मिती, रासायनिक प्रक्रियांचे अनुकरण, नवीन पदार्थांचा अभ्यास तसेच काही गुंतागुंतीच्या गणिती समस्यांच्या निराकरणासाठी भविष्यात त्यांचा उपयोग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाकडे केवळ आकर्षण म्हणून नव्हे, तर त्यातील वैज्ञानिक क्षमता आणि मर्यादा समजून घेऊन चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. घनश्याम जाधव यांनी केले.
येथील संत रामदास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने 'क्वांटम संगणकांचा शेवटचा टप्पा' या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
माजी प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव यांनी प्रमुख व्याख्याते म्हणून विद्यार्थ्यांना क्वांटम संगणकांचे तंत्रज्ञान, कार्यपद्धती, क्षमता आणि मर्यादा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी विनायक चोथे होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. जाधव यांनी पारंपरिक संगणक आणि क्वांटम संगणक यांतील फरक स्पष्ट करताना पारंपरिक संगणकांमध्ये बिट्स, तर क्वांटम संगणकांमध्ये क्यूबिट्सचा वापर केला जात असल्याचे सांगितले.
सुपरपोझिशन, एंटँगलमेंट आणि क्वांटम इंटरफेरन्स या क्वांटम संगणनाच्या प्रमुख संकल्पना असून, त्यांच्या आधारे काही गुंतागुंतीच्या वैज्ञानिक व गणिती समस्या सोडविण्याच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. मात्र, क्वांटम संगणक हे सर्व प्रकारच्या समस्यांसाठी पारंपरिक संगणकांपेक्षा अधिक प्रभावी ठरतीलच असे नाही, याकडेही डॉ. जाधव यांनी लक्ष वेधले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रशांत सोनवणे यांनी केले, तर डॉ. दिलीप सपाटे यांनी आभार मानले.
व्यावहारिक वापर वाढण्याची गरज
क्वांटम संगणकांच्या विकासासमोर क्यूबिट्सची स्थिरता, बाह्य वातावरणाचा परिणाम, क्वांटम त्रुटींवर नियंत्रण आणि मोठ्या प्रमाणावर विश्वासार्ह प्रणाली विकसित करण्याचे आव्हान आहे. या तंत्रज्ञानाचा व्यावहारिक वापर वाढविण्यासाठी संशोधनाची मोठी गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.