

Insect infestation on soybean crop
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाईसह परिसरात यंदा सोयाबीनचे पीक चांगले आले असतानाच सोयाबीन पिकावर विविध किडीचा प्रादुर्भाव वाढू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिता वाढली आहे. सोयाबीन पिकावर पान खाणारी अळी, खोडकिडा तसेच चक्रीभुंगा आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसत असून, पीक किडींच्या विळख्यात सापडू नये यासाठी शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे.
पिंपळगाव रेणुकाई परिसरात सध्या सोयाबीनचे पीक वाढीच्या अवस्थेत असून, पिकाची वाढ चांगली होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे सोयाबीन पिकाच्या पानावर पान खाणाऱ्या अळीमुळे सोयाबीनची पाने कुरतडली जात असल्याने पिकाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी सकाळपासूनच शेतात फवारणीची कामे उरकत असल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे. विशेषतः पान खाणारी अळी वेळीच नियंत्रणात न आल्यासपिकाच्या पानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन प्रकाश संष्लेषण प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.
खोडकिडा व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भावही पिकावर वाढत असल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पिकाची नियमित पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. यंदा सोयाबीनकडून शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातच किडींचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे वळले आहेत.
मार्गदर्शन करावे
कृषी विभागानेही परिसरातील सोयाबीन पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना किडींची अचूक ओळख, योग्य कीड नियंत्रण पद्धती आणि शिफारशीनुसार फवारणीबाबत मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.