

Increased use of sprinkler irrigation for Rabi crops, resulting in water conservation.
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यात रब्बी हंगाम जोमात सुरू असून गहू व हरभरा ही प्रमुख पिके सध्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. या काळात सुरू असलेल्या थंडीच्या वातावरणाचा योग्य लाभघेण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहेत. वाढता खर्च आणि बदलते हवामान या पार्श्वभूमीवर तुषार सिंचन ही शाश्वत आणि परिणामकारक पद्धत ठरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
घनसावंगी तालुक्यात गहू पिक फुटव्याच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी ओंवी भरण्याच्या काळात समसमान ओलावा मिळणे अत्यंत गरजेचे असते. तुषार सिंचनामुळे संपूर्ण शेतात एकसारखे पाणी पडत असल्याने पिकाची वाढ संतुलित होते. पानांचा तजेला वाढून गहू पीक अधिक जोमदार दिसत आहे. हरभरा घाटे धरण्याच्या अवस्थेत हलक्या पण वेळेवर दिलेल्या तुषार सिंचनामुळे पिकाला चांगली वाढ मिळत असल्याचे निरीक्षण आहे.
पारंपरिक पाटपाणी पद्धतीत मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. त्याउलट तुषार सिंचनामुळे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होते. जमिनीची धूप कमी होते, ओलावा टिकून राहतो आणि खतांची कार्यक्षमताही वाढते. विशेषतः हलक्या व मध्यम जमिनीत तुषार सिंचन अधिक उपयुक्त ठरत आहे. कमी वेळेत सिंचन पूर्ण होत असल्याने विजेचा वापर कमी होऊन शेतकऱ्यांचा खर्चही घटत आहे.
कृषी विभाग व तज्ज्ञांकडूनही शेतकऱ्यांना आधुनिक सिंचन पद्धती स्वीकारण्याचे मार्गदर्शन केले जात आहे. शासनाच्या सूक्ष्म सिंचन योजनांअंतर्गत अनुदान उपलब्ध असल्याने अनेक शेतकरी तुषार संच बसवत आहेत. काही प्रगतशील शेतकऱ्यांनी सांगितले की, मागील हंगामात तुषार सिंचनामुळे गहू व हरभरा पिकांचे उत्पादन समाधानकारक मिळाले आहे. एकूणच, गहू व हरभरा पिकांसाठी तुषार सिंचनाचा वाढता वापर हा शेतीतील सकारात्मक बदल मानला जात असून, पाणी बचत, खर्चात कपात आणि उत्पादनवाढ या दृष्टीने ही पद्धत भविष्यात अधिक उपयुक्त ठरणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.