

आष्टी : परतूर तालुक्यातील लिलाव झालेल्या चांगतपुरी येथील रेती घाटातून नियमबाह्य पोकलेन मशिनद्वारे रात्रीच्या सुमारास वाळू उपसा केला जात असून पाहणी करण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणे हल्ले होत आहेत. शासनाचे निकष डावलून होत असलेला वाळू उपसा तातडीने थांबवावा नसता येत्या 1 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा समाजसेवक रामप्रसाद थोरात, महेश नळगे, सिध्देश्वर सोळंके, पंजाबराव देशमुख यांनी दिला आहे.
परतूर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चांगतपुरी येथील वाळूघाटाचा लिलाव झाला असून सदरील वाळूघाटातून नियमांचे उल्लंघन करून रात्रीच्या वेळेस वाळू उपसा केला जात आहे. चांगतपुरी वाळूघाटाचा लिलाव झालेल्या गटांमध्ये सध्या पाणी आहे. वाळू उघडी नाही. प्रशासनाने सदरील घाटाचा ताबा देणे अयोग्य होते.
गट सोडून इतर जागेवरून वाळू पाण्यातून उपसा करून बोटी, पोकलेन व जेसीबीच्या सहाय्याने उपसा केला जात आहे. वाळू भरण्यासाठी मजुरांचा वापर होणे गरजेचे असताना यंत्रांच्या सहाय्याने वाळू भरण्याचे काम चालू आहे.
याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देउनही दुर्लक्ष केले जात आहे. सामाजिक कार्यकर्ते घाटावर पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना शिवीगाळ करणे, कपडे फाडणे असे प्रकार घडत आहेत. नियमांचे उल्लंघन करून केला जात असलेला वाळू उपसा बंद न झाल्यास1 मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक कार्यकर्त्यांना उपोषणाला बसणार असल्याचा इशारा रामप्रसाद थोरात, महेश नळगे, सिध्देश्वर सोळंके, पंजाबराव देशमुख यांनी दिला आहे.
ताकीद दिली
तहसीलदार दामोदर जाधव यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मी स्वतः वाळू घाटाची पाहणी करून ठेकेदास नियमांचे उल्लंघन होणार नाही यासाठी सक्त ताकीद दिली आहे.