

Illegal liquor stock worth ₹1.25 lakh seized
जालना, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील जानेफळ दाभाडी येथील हॉटेल पायलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी (दि. ६) छापा टाकून १ लाख २३ हजार ७८० रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी हॉटेल मालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त संगीता दरोकर तसेच अधीक्षक ज्ञानेश्वरी यांच्या आहेर मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे भरारी पथकाने हॉटेल पायलवर छापा टाकला असता, विविध बँडच्या देशी व विदेशी मद्याच्या सीलबंद बाटल्यांचा मोठा साठा आढळून आला. यामध्ये देशी दारू भिंगरी, देशी दारू सखू, इम्पिरियल ब्ल्यू, रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, बडवायझर बिअर, किंगफिशर बिअर तसेच मॅकडॉवेल नं. १ या ब्रँडच्या बाटल्यांचा समावेश होता. एकूण १,२३,७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी वर्दीनाथ रामकिसन मिसाळ (वय ४२, रा. जानेफळ दाभाडी, ता. भोकरदन) व हरिदास सुखदेव साबळे (वय ३५, रा. पिंपळगाव शेरमुळी, ता. भोकरदन) यांच्याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हाभरात अवैध दारु निर्मिती निर्मिती आणि विक्रीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे. यापूर्वी बनावट दारू निर्मितीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत पर्दाफाश केला होता. यामुळे अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
ही कारवाई प्रभारी निरीक्षक एल. एम. धनगर यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक एस. एन. गायकवाड, एस. एस. गुंजाळे, जवान-वाहनचालक बी. डी. पवार, जवान के. एस. गुणावत, जी. आर. तायडे, व्ही. एल. खरात तसेच महिला जवान दिक्षा जाधव यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा अधिक तपास दुय्यम निरीक्षक एस. एन. गायकवाड हे करीत आहे.
विभागाला माहिती द्या
अवैध मद्यनिर्मिती, विक्री अथवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल-फ्री क्रमांका १८००८३३३३३३ वर अथवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती द्यावी. ज्ञानेश्वरी आहेर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जालना.