

जाफराबाद : तालुक्यातील खापरखेडा शिवारातील विहिरीत विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती व सासूविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खापरखेडा येथील सरिता भागवत सूळ (वय २५), (रा. डोलखेडा) असे मयत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी तिचे वडील यादव श्रीराम उगले (रा. खापरखेडा) यांनी जाफराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, सरिता हिचा विवाह सुमारे तीन वर्षांपूर्वी भागवत अशोक सूळ यांच्यासोबत झाला होता. त्यांना दीड वर्षांची मुलगी आहे. सरिता माहेरी आल्यानंतर ती पती भागवत सूळ व सासू सविता सूळ हे तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार शिवीगाळ व मारहाण करत असल्याचे आई-वडिलांना सांगत होती.
१४ जून रोजी भागवत सूळ यांनी यादव उगले यांना डोलखेडा येथे बोलावून घेतले. तेथे सरितावर गावातील एका युवकासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी पतीने सरिताला वडिलांसमोर मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर यादव उगले यांनी मुलगी सरिताला माहेरी खापरखेडा येथे आणले.
त्या रात्री सरिताने पती व सासूकडून होत असलेल्या छळाची माहिती आई-वडिलांना दिली. मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे ती घरातून बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. नातेवाईकांकडे शोध घेतल्यानंतरही ती आढळून न आल्याने जाफराबाद पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
दरम्यान १६ जून रोजी सकाळी खापरखेडा शिवारातील तिच्या काकांच्या शेतातील विहिरीत सरिताचा मृतदेह तरंगताना आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
कारण अस्पष्ट
फिर्यादीच्या तक्रारीवरून पती भागवत अशोक सूळ व सासू (दोघे रा. डोलखेडा) यांनी सरिताच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा सतत मानसिक व शारीरिक छळ केल्यारने सरिताने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी जाफराबाद पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मृत्यूमागील नेमके कारण व इतर बाबींचा तपास पोलिस करीत आहेत.