

Hunger strike demanding action against encroachments
अंबड, पुढारी वृत्तसेवाः अंबड नगर परिषद हद्दीतील सर्व्हे क्रमांक ८७ मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश देऊनही कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब हरिभाऊ खरात यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात उपविभागीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी गेल्या चार दिवसांपासून खरात यांचे अंबड नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. खरात यांच्या तक्रारीनुसार, नगर परिषदेने २०२२ मध्ये शहरातील जुन्या लिलावातील ३८४ गाळे व जागांचे करार रद्द करून त्या ताब्यात घेण्यासाठी संबंधित धारकांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, सर्वे क्रमांक ८७ मधील नगर परिषदेच्या मोकळ्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आले नाही.
संबंधित जागेवर कोणतीही बांधकाम परवानगी किंवा करार नसताना नवीन बांधकाम सुरू करण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबत खरात यांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित बांधकाम थांबवून अतिक्रमण हटविण्याचे तसेच जागा नगर परिषदेच्या ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते.
मात्र, या आदेशांची अंमलबजावणी झाली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यानंतर ही संबंधित अधिकारी आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. परंतू याकडे ही दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मागण्यांवर कार्यवाही होईपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.