

Housing engineer caught in bribery Case
जालना, पुढारी वृत्तसेवा : घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर दुसरा हप्ता टाकण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी करून ३० हजार रुपये स्वीकारणाऱ्या कंत्राटी गृहनिर्माण अभियंत्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवार दि. २७ रोजी अभियंत्याच्या प्लॉट न २०, गंगाधरवाडी, हरेकृष्ण नगर, जालना येथील घरातच करण्यात आली.
दरम्यान, तक्रारदार यांच्या आईला व गावातील इतर लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले आहेत. त्यांना पाहिला हप्ता मिळावा यासाठी राणी उंचेगाव सर्कल येथे कार्यरत विशाल लक्ष्मणराव कनोजे यांच्याकडे वारंवार मागणी करण्यात येत होती. मात्र, अभियंता वारंवार टाळाटाळ करत होता. ही बाब गावातील ४ ते ५ लाभाभ्यांनी तक्रारदार हे महिला सरपंचाचे पती असल्याने त्यांना सांगितली.
त्यावरून तक्रादार यांनी २३ ऑगस्ट रोजी कनोजे यांना घरकुलचा पाहिला हप्ता टाकण्यासाठी विनंती केली. कनोजे यांनी तक्रारदार यांची आई व इतर ३९ लाभार्थी असे एकूण ४० लाभार्थी यांचे खात्यावर पहिला हप्ता टाकला. त्यानंतर दि. २४ ऑगस्ट रोजी तक्रारदार हे कनोजे यांच्या घरी जाऊन आईचा घरकुलाचा दुसरा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा करण्याची विनंती केली. मात्र, अभियंता कनोजे यांनी तुमच्या सांगण्यावरून चाळीस लाभार्थी यांचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर जमा केला असल्याचे सांगून दुसरा हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही पहिले हप्त्यात टाकलेल्या लाभार्थी यांचे कडून प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे ४० लाभार्थी यांचे एकूण ४० हजार रुपये द्या.
तेव्हा तुमचा घरकुलाचा दुसरा हप्ता तुमच्या खात्यावर पडेल. अशी लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत विभागाकडे याची तक्रार केली. त्या तक्रारीनुसार दि. २६ ऑगस्ट रोजी पंच यांच्या सोबत विशाल कनोजे यांच्याकडे पाठवून पडताळणी केली.
कंत्राटी अभियंता यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष ४० हजार रुपये लाच मागणी करून लाच स्वीकारणे बाबत संमती दिली. अखेर बुधवार दि. २७ ऑगस्ट रोजी तक्रादार यांचेकडून पंचासमक्ष विशाल कनोजे यांनी ३० हजार रुपये स्वीकारले. लाचेची रक्कम सापळा पथकाने ताब्यात घेऊन लाचेची रक्कम पंचासमक्ष जप्त केली. कनोजे यांच्या अंग झडतीत रेडमी कंपनीचा मोबाईल, लाचेची ३० हजार रु रोख रक्कम मिळून आली.
कनोजे याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून पुढील निरीक्षण, विश्लेषण करून तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. घरझडती प्रक्रिया सुरू आहे. त्याच्या विरोधात पोलिस ठाणे तालुका जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हा सापळा पोलिस निरीक्षक कोमल शिंदे, सहायक सापळा अधिकारी बी.एस. जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील पोहेकॉ. गजानन खरात, श्रीनिवास गुड्डुर, पोलिस अंमलदार गजानन कांबळे, शिवलिंग खुळे, अमोल चेके, मनोहर भुतेकर, चालक पोहेका भालचंद्र बिणोरकर आदींनी केली.