

घनसावंगी : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिकमत उढाण यांनी मतदारसंघातील रस्ते, पूल, प्राथमिक शिक्षण आणि सिंचनाच्या गंभीर प्रश्नांवर अभ्यासपूर्ण व आक्रमक भूमिका मांडत शासनाचे लक्ष वेधले. केवळ घोषणा करून विकास साध्य होणार नसून प्रत्यक्ष निधी, नियोजन आणि कालबद्ध अंमलबजावणी आवश्यक असल्याचे स्पष्ट करत शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी आ. उढाण यांनी सभागृहात केली.
रस्ते व पुलांच्या प्रश्नावर बोलताना आ. उढाण यांनी राज्य महामार्ग आणि मुख्य जिल्हा मार्गांची अत्यंत बिकट अवस्था सभागृहासमोर मांडली. मतदारसंघात एकूण सात राज्य महामार्ग असून त्यांची एकूण लांबी २६६.५५ किलोमीटर आहे. यापैकी केवळ ९९.६५ किलोमीटर रस्ते समाधानकारक स्थितीत असून तब्बल १६६.९० किलोमीटर रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत.
या रस्त्यांमुळे दररोज नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून अपघातांचे प्रमाणही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघातील चार प्रमुख रेल्वे फाटकांवरून दररोज सुमारे ३४ रेल्वे धावत असल्याने प्रत्येकवेळी सरासरी ११ मिनिटे फाटक बंद राहते. त्यामुळे दिवसातील जवळपास ६ तास ४१ मिनिटे वाहतूक ठप्प राहते.
या परिस्थितीमुळे रुग्णवाहिका, शालेय वाहने, शेतमाल वाहतूक करणारी वाहने तसेच सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी तातडीने रेल्वे उड्डाणपूल उभारण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून कालबद्ध आराखडा तयार करण्याची मागणी त्यांनी केली.
ग्रामीण भागातील शाळांची अत्यंत चिंताजनक अवस्था सभागृहासमोर मांडली. त्यांच्या मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या एकूण १७४ प्राथमिक शाळा असून त्यापैकी १०४ शाळा मोडकळीस आलेल्या आहेत. १२४ शाळांना मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीची गरज आहे. ६२ शाळांमध्ये संरक्षक भिंत नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
१४ शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही, तर २१ शाळांमध्ये मुलांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळणार, असा सवाल उपस्थित करत परदेशी विद्यापीठे आणण्यापूर्वी ग्रामीण प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
आमदार उढाण यांच्या सविस्तर आणि तथ्याधारित मांडणीनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सभागृहात सकारात्मक भूमिका घेत रस्ते, पूल आणि रेल्वे उड्डाणपुलांच्या कामांसाठी आवश्यक निधीची उपलब्धता तपासून प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यामुळे घनसावंगी मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
राज्य महामार्गांवरील ३३ पुलांपैकी १९ पुलांची अवस्था दयनीय असल्याचे नमूद करत त्यांनी या पुलांची तातडीने दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता व्यक्त केली. तसेच मुख्य जिल्हा मार्गांची एकूण लांबी ४२५.२० किलोमीटर असून त्यापैकी २२८ किलोमीटर रस्ते खराब झाले आहेत. या मार्गांवरील २५ पुलांपैकी एकही पूल सुस्थितीत नसल्याची धक्कादायक बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.