

जालना : अंबड व घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या 24 कोटी 90 लाख रुपयांच्या अनुदान घोटाळ्यातील आरोपींना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणातील 18 आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावले आहेत.
जालना जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतर शासनाने बाधित शेतकऱ्यांसाठी जीआर काढून अनुदान जाहीर केले होते. मात्र अंबड व घनसावंगी तालुक्यातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून खोट्या याद्या तयार करत, शेतकरी नसलेल्या व्यक्तींची नावे अनुदान लाभार्थी यादीत समाविष्ट करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याची तक्रार प्राप्त झाली होती.
या तक्रारीनंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती स्थापन केली. चौकशीत 240 गावांमध्ये 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अंबड पोलिस ठाण्यात एकूण 22 तलाठी, तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत कामकाज करणारे 5 आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात काम करणारा एक असे एकूण 28 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आतापर्यंत 13 आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, आरोपींनी प्रथम जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून उच्च न्यायालयाने 18 आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केले, त्यामुळे आरोपींवरील कारवाई अधिक वेगाने होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे मुख्य सरकारी अभियोक्ता अमरजीतसिंग गिरासे यांच्यासह सरकारी अभियोक्ता अफताब खान व आर. के. इंगोले यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
ही कारवाई जालना पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल पोलिस, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक सिध्दार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, पोलिस अंमलदार गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, सागर बावीस्कर, दत्ता वाघुंडे, विष्णू कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रवींद्र गायकवाड, शुभम तळेकर, श्रेयस वाघमारे, चालक पाठक मेजर, महिला अंमलदार, जया निकम, निमा घनघाव, मंदा नाटकर यांनी पार पाडली.
आरोपींत या 18 जणांचा समावेश
गणेश ऋषिंद्र मिसाळ, विठ्ठल प्रल्हादराव गाडेकर, सुकन्या श्रीकृष्ण गवते, रामेश्वर नाना जाधव, विजय हनुमंत जोगदंड, रमेश लक्ष्मण कांबळे, सुरज गोरख बिक्कड, बप्पासाहेब रखमाजी भुसारे, कृष्णा दत्ता मुजगुले, निवास बाबूसिंग जाधव, विनोद जयजयराम ठाकरे, सुनील रामकृष्ण सोरमारे, वैभव विश्वंभर आडगावकर, विजय निवृत्ती भांडवले, कैलास शिवाजीराव घारे, डिगंबर गंगाराम कुरेवाड, दिनेश ज्ञानेश्वर बेराड, मोहित दत्तात्रय गोषीक.