

Hammer on encroachment in Indiranagar
जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण अतिक्रमणांविरोधात प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवार दि. ९ रोजी दुपारी सुमारे एक वाजल्यापासून प्रशासनाच्या वतीने इंदिरानगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. या कारवाईदरम्यान महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने १० ते १२ अतिक्रमणांवर कारवाई करून ती हटवली आहेत.
महापालिका प्रशासनाकडून यापूर्वीच अतिक्रमणधारकांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यामध्ये संबंधितांनी स्वतःहून अतिक्रमण हटवण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र बहुतेक अतिक्रमणधारकांनी कोणतीही कारवाई न करता अतिक्रमण कायम ठेवले. त्यामुळे आज महापालिका पथकाने पोलिस बंदोबस्तात प्रत्यक्ष कारवाई सुरू केली. इंदिरानगर परिसरातील पदपथ, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी करण्यात आलेली अतिक्रमणे हटवण्यात आली. यामध्ये दुकानांबाहेर बांधलेल्या शेड्स, फूटपाथवरील साहित्य, तसेच बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या बांधकामांचा समावेश आहे.
"शहरातील सर्व नागरिकांनी अतिक्रमण स्वखुशीने हटवावे. जर कोणी अतिक्रमण काढले नाही तर प्रशासन कठोर कारवाई करेल," असा इशारा महापालिकेचे अतिक्रमण विभागप्रमुख पंडित पवार यांनी दिला. या कारवाईदरम्यान अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, अभियंते तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. संपूर्ण कारवाई महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
महापालिकेने शहरातील रस्ते मोकळे ठेवण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थेतील अडथळे दूर करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. इंदिरानगरमधील कारवाईनंतर पुढील काही दिवसांत शहरातील इतर भागातही अशाच प्रकारे अतिक्रमण हटाव मोहिमा राबविण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
महापालिका प्रशासनाने नागरिकांना स्पष्ट संदेश दिला आहे की बेकायदेशीर अतिक्रमण सहन केले जाणार नाही. शहर स्वच्छ, सुटसुटीत आणि वाहतुकीसाठी सुलभ ठेवणे हे प्रशासनाचे उद्दिष्ट असल्याचेही सांगण्यात आले आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढून प्रशासनाला सहकार्य केल्यास कोणत्याही अडचणीशिवाय ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण होऊ शकते, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी महापालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. त्यांनी सांगितले, की आम्ही अतिक्रमणाच्या विरोधात नाही, पण नोटीस न देता अचानक घरे पाडणे हा सरळ अन्याय आहे. आम्ही या संदर्भात जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. दिवाळीच्या तोंडावर गोरगरिबांच्या घरावर बुलडोजर चालविणे योग्य नाही. त्यांना अजून काही दिवसांचा अवधी द्या. इंदिरानगरातील रहदारीस कोठे अडथळा निर्माण होतो, असाही सवाल यावेळी उपस्थित केल्याचे विजय लहाने यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी आमच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला.