

Gyanoba - Tukoba Aadhar Dindi will be held tomorrow in Jalna
जालना, पुढारी वृत्तसेवा : संतभूमी मराठवाड्यात नैसर्गिक आपत्तीमुळे खचून गेलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी वारकरी साहित्य परिषद सरसावली असून परिषदेच्या वतीने "ज्ञानोबा - तुकोबा आधार दिंडी" या आगळ्यावेगळ्या सामाजिक चळ-वळीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील दिंडी रविवारी (ता. १०) दुपारी ०२.०० वा. जालना शहरात अंबड चौफुलीवर येणार असल्याची माहिती परिषदेचे मार्गदर्शक संजीव पाटील यांनी दिली.
दिंडी च्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. १०) शासकीय विश्रामगृहात जालना जिल्ह्याची नियोजन बैठक जिल्हाध्यक्ष. दत्तात्रय महाराज बेरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शक संजीव पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख कल्याण बांगर, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू महाराज देठे जिल्हा सचिव सोपान चौधरी, गणेश म. महाराज जाधव, बळीराम म. शिंदे, सुमीत म. शिनगारे, मधुकर म. कांबळे, महादेव म. सुरुंग, पांडुरंग म. चौधरी, साहेबराव म. पाटील, सागर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठवाड्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांना आळा बसावा, मानसिक आधार मिळून आत्महत्यांचे प्रमाण रोखले जावे या उद्देशाने वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील आणि डॉ. सदानंद मोरे यांच्या संकल्पनेतून मराठवाड्यात दौरा करणार आहे.
" शेतकरी आत्महत्या थांबल्याच पाहिजे" वारकरी संप्रदाय ही सामाजिक जबाबदारी म्हणून पुढे येत आहे. असा निर्धार यावेळी करण्यात आला. दरम्यान जालना शहरात अंबड चौफुलीवर दुपारी ०२.०० वा. दिंडीचे जल्लोषात स्वागत केले जाणार असून जिल्ह्यातील वारकरी, महिला, शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.