

Guidance on organic farming provided by agricultural officers in Khadki
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने मौजे खडकी येथे 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी विशेष दौरा करून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन केले.
मुंबई येथील प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे (पीएमयू) प्रकल्प उपसंचालक संतोष ममदापुरे आणि प्रकल्प अधिकारी अरुण जाधव यांनी आज मौजे खडकी येथे प्रत्यक्ष भेट दिली. या वेळी त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांनी बेड (गादी वाफा) पद्धतीवर केलेल्या सोयाबीन आणि कपाशी पिकांच्या लागवडीची पाहणी केली. पीक वाढीचा आढावा घेत अधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विविध तांत्रिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.
या वेळी बोलताना अधिकाऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक निविष्ठांचा वापर वाढवण्याचे आवाहन केले. पिकांवरील कीड व्यवस्थापनासाठी दशपर्णी अर्काचा वापर, जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जीवामृत, पिकांच्या वाढीसाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गोकृपा अमृत, तसेच नैसर्गिक कीटकनाशक म्हणून निबोळी अर्काचा वापर कसा करावा याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
याशिवाय, शून्य मशागतीचे तंत्र वापरून शेतीचा खर्च कसा कमी करता येतो आणि उत्पादन कसे वाढवता येते यावरही विशेष भर देण्यात आला. या दौऱ्याप्रसंगी जालना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या तंत्र अधिकारी सोनाली काकडे, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या उप कृषी अधिकारी उल्का बनकर, मंडळ कृषी अधिकारी अशोक बिनगे, उप कृषी अधिकारी सुधाकर सुसर, सहायक कृषी अधिकारी सुदाम जामुंदे, समाधान वानखेडे यांच्यासह स्थानिक शेतकरी श्रीपत वानखेडे, भगवान वानखेडे व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.