

Godavari crosses danger level; repeats after 20 years
शहागड, पुढारी वृत्तसेवा : पावसाने सर्वत्र थैमान घातल्यामुळे जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी पात्रात तीन लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग होत असून यामुळे गोदावरी तुडुंब भरली आहे. अंबड, घनसावंगी तालुक्यातील ३२ गावांना या पाण्याचा धोका निर्माण होण्याची भीती उद्भवली आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांना रात्रवैऱ्याची असणार आहे तर अनेक गावांचे सध्या प्रशासनाकडून स्थलांतरित करण्यात येत आहे.
पावसाने थैमान घातल्यामुळे गोदावरी पात्र तुडुंब भरले असून त्यात अजून तीन लाख क्युसेसच्यावर पाणी सोडल्यामुळे गोदाकाठच्या गावांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून यामध्ये ३२ गावांना पूर आल्यास पाण्याचा वेढा पडतो. यामध्ये बळेगाव, आपेगाव, साष्टपिंपळगाव, डोमलगाव, गोरी-गंधारी, शहागड, वाळकेश्वर, कुरण, पाथरवाला, गोंदी, हसनापूर, कोठाळा, गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन, आगरनांदुर, संगमजळगाव, हिंगणगाव, गोंदी खु., कटचिंचोली, पांगुळगाव, सुरळेगाव, पांचाळेश्वर, म्हाळसपिंपळगाव, सावळेश्वर, खामगाव, गंगावाडी, काठोडा, नागझरी, राहेरी, बोरगावथडी, भोगलगाव, पांढरी, मिरगाव, श्रीपत तपेनिमगाव, ढालेगाव, अंतरवाला, गोपत पिंपळगाव, रामपुरी, मनुबाई जवळा, गुळज (भगवाननगर), पाथरवाला बु., गुंतेगाव, पाथरवाला खु., बोरगाव बु. या गावांचा समावेश आहे. या गावांसाठी रविवारीची रात्र वैऱ्याची होती. प्रशासनाकडून अनेक गावांचे स्थलांतर करणे सुरू आहे.
शहागडला एनडीआरएफची २५ लोकांची एक तुकडी दाखल झालेली असून शहागड गावातील किल्ल्यामधील रस्त्यावर पाणी घुसल्याने रविवारी सायंकाळी दहा कुटुंबांतील पन्नास लोकांना स्थलांतरित करण्यात आलेले आहे.