

2,000 citizens evacuated from Ghansavang
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा :
जायकवाडी धरणातून ३ लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीला महापूर आला आहे. गोदाकाठावरील बानेगाव, लिंगसेवाडी, सौंदलगाव, भोगगाव, शेवता, जोगलाद-वी, मंगरूळ, राजाटाकळी, गुंज, मुद्रेगाव, शिरसवाडी, उक्कडगावसह आदी गावांतून तहसीलदार पूजा वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली गावांत पाणी येण्याच्या आधी गावातील सुमारे १ हजार ९७९ नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार पूजा वंजारी, नायब तहसीलदार मोनाली सोनवणे यांच्यासह नियंत्रण कक्षप्रमुख, आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख येथे उपस्थित आहेत.
घनसावंगी तालुक्यात २००६ सालापेक्षाही भयानक महापूर आला आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चिखल झाला. स्थलांतरित नागरिकांना तीर्थपुरी येथील मत्स्योदरी शाळा, व्यंकटेश मंगल कार्यालय कुंभार पिंपळगाव, नाथसागर, राजाटाकळी, ब्लू सफायर कंडारी या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. गोदावरीच्या काठावरील गावांमध्ये सूचना केलेल्या आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले असल्याचे तहसीलदार मोनाली सोनवणे यांनी सांगितले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिकमत उढाण यांच्या मार्फत व्हिडीओ कॉलद्वारे थेट पूरग्रस्तांशी संवाद साधला. आणि नागरिकांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत धीर दिला. या संकटसमयी शासन तुमच्या सोबत आहे, कुणालाही एकटे पडू देणार नाही हिकमत उढाण व आपले सर्व कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत असा विश्वास त्यांनी पूरग्रस्तांना दिला.