Jalna Agriculture News : पहिल्याच वेचणीत कपाशीचा धुरळा

कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; एकरी एक ते दीड क्विंटलच उतारा, लागवड खर्चही निघणे अवघड
Jalna Agriculture News
घनसावंगी : पहिल्या वेचणीत कापूस संपल्याने शेतात कपाशीच्या काड्या उभ्या दिसून येत आहे. pudhari photo
Published on: 
Updated on: 

घनसावंगी : तालुक्यात यंदा दुष्काळाचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पावसाने दिलेल्या दीर्घ खंडामुळे जमिनीतील ओलावा कमी झाल्याने कापूस पिकाच्या वाढीवर परिणाम झाला. बोंडधारणा कमी झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली असून, अनेक शेतकऱ्यांना एकरी अवघा एक ते दीड क्विंटलच कापूस मिळत आहे.

विशेष म्हणजे अनेक ठिकाणी एकदाच कापूस वेचणी झाली असून, त्यानंतर शेतात केवळ कापसाच्या काड्या उभ्या राहिल्याचे चित्र आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने काही प्रमाणात साथ दिल्याने शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली. मात्र, पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात पावसाने मोठा खंड दिला. जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाल्याने कापसाची वाढ खुंटली.

Jalna Agriculture News
Jalna Crime : दुष्काळ पेटला; अंबडमध्ये टँकरच्या बिलावरून कर्मचाऱ्याला मारहाण

परिणामी झाडांवर अपेक्षित प्रमाणात बोंडे धरली नाहीत. जी बोंडे धरली, त्यातील अनेक बोंडांचा आकार आणि वजनही अपेक्षेप्रमाणे झाले नाही. त्यामुळे कापूस वेचणी सुरू होताच उत्पादनातील घट प्रकर्षाने जाणवू लागली.

सामान्य परिस्थितीत कापूस पिकातून हंगामात दोन-तीन किंवा त्याहून अधिक वेचण्या होतात. प्रत्येक वेचणीत शेतकऱ्याला काही प्रमाणात उत्पादन मिळते. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतांमध्ये पहिल्याच वेचणीनंतर उत्पादन जवळपास थांबले आहे. झाडांवर नवीन बोंडे धरत नसल्याने पुढील वेचणीची आशाही मावळली आहे. त्यामुळे काही शेतांमध्ये कापसाऐवजी केवळ वाळलेल्या काड्या उभ्या असल्याचे चित्र दिसत आहे.

कापूस पिकासाठी मशागत, बियाणे, खते, कीटकनाशके, फवारण्या तसेच मजुरीवर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला. पिकाला वाचविण्यासाठी उपलब्ध पाण्याचा वापर करून शेतकऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, पावसाने साथ न दिल्याने त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आता एकरी एक ते दीड क्विंटलच उतारा मिळत असल्याने उत्पादनातून खर्चाची भरपाई करणेही कठीण झाले आहे.

Jalna Agriculture News
Karjat Tree Cutting : टोरंट प्रकल्पाच्या वृक्षतोडीमुळे साईडोंगरचे जंगल धोक्यात

दुष्काळाचा परिणाम केवळ कापूस उत्पादनावरच झालेला नसून, शेतकऱ्यांच्या संपूर्ण आर्थिक गणितावर झाला आहे. कापसातून अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याने शेतीचा खर्च, कर्जाची परतफेड, पुढील हंगामासाठी लागणारा पैसा आणि कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. त्यामुळे यंदाचा कापूस हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठ्या आर्थिक अडचणीचा ठरत आहे. आर्थिक मदतीची गरज आहे.

तातडीने उपाय-योजना कराव्यात

दुष्काळामुळे कापूस पिकाचे झालेले नुकसान प्रत्यक्ष शेतावर जाऊन वस्तुनिष्ठपणे नोंदवावे, पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दुष्काळी मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. उत्पादनात झालेली मोठी घट लक्षात घेऊन शासनाने कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

यंदा पावसाने साथ न दिल्याने कापसाची वाढच खुंटली. एकदाच कापूस वेचणी झाली असून, त्यानंतर झाडांवर बोंडे धरलेली नाहीत. एकरी केवळ एक क्विंटलच उत्पादन मिळत असल्याने बियाणे, खत, फवारणी आणि मजुरीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. दुष्काळामुळे मोठे नुकसान झाले असून, शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी.

ज्ञानेश्वर पवार, शेतकरी, बोलेगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.