

अंबड : अंबड तालुक्यात एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाईचे संकट गंभीर बनले असताना दुसरीकडे टँकरच्या बिलांच्या व्यवहारावरून पंचायत समिती कार्यालयातच कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना सोमवार, (दि. २) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.
पंचायत समितीच्या पाणीटंचाई विभागातील कनिष्ठ सहायक प्रमोद नारायण वाघ (वय ४०) यांना एका अज्ञात व्यक्तीने मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. या घटनेमुळे पंचायत समिती कार्यालयातील कामकाजासह टँकरच्या बिलांच्या व्यवहाराबाबत सुरू असलेल्या चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे.
मारहाणीत जखमी झालेल्या वाघ यांना प्रथम अंबड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले असून, प्रकृती लक्षात घेता पुढील उपचारासाठी त्यांना जालना येथे हलविण्यात आले.
विशेष म्हणजे, जखमी अवस्थेत वाघ यांनी अंबड पोलिस ठाणे गाठले होते. मात्र, त्यांची अवस्था पाहून पोलिसांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. उपचारानंतर त्यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक संतोष बोडके यांनी दिली.
दरम्यान, टँकर कंत्राटाच्या बिलांच्या व्यवहारातून हा वाद झाल्याची चर्चा आहे. टँकर कंत्राटदार आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांमध्ये देण्या-घेण्याच्या व्यवहारावरून वाद झाल्यानंतर त्याचे पर्यवसान मारहाणीत झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण आणि हल्लेखोराची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
पोलिसांच्या तपासानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येणार आहे. मारहाण झाल्यानंतर अंबड पंचायत समितीच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली.
घटनेच्या वेळी पंचायत समिती कार्यालयात एकच गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून पंचायत समिती कार्यालयाच्या कामकाजाबाबत अनागोंदी आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या तक्रारींची चर्चा होत असताना आता थेट कार्यालयातच कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने प्रशासकीय शिस्त आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुष्काळाच्या काळात टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा, कंत्राटदारांची बिले आणि त्यासंबंधीच्या व्यवहारांची पारदर्शक चौकशी होण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.
प्रशासकीय यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
अंबड तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत पाणीपुरवठ्याच्या टँकरच्या बिलांवरून पंचायत समिती कार्यालयातच कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. टँकर कंत्राटदारांची बिले मंजूर करण्यासाठी आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चा यापूर्वीही होत होती. आता या घटनेमुळे त्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार
या घटनेच्या पार्श्वभूमीवर अंबड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती ज्योती कवडदेवी यांच्याशी संपर्क साधला असता, वाघ यांच्याबाबतच्या तक्रारी अद्याप आपल्याकडे प्राप्त झालेल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची माहिती घेऊन आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. तसेच याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना स्पष्ट केले.