

Ganesh Mandals provide food aid to Maratha protesters
जालना, पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जालना तालुक्यातील अनेक गावांमधून भंडारा रद्द करून आंदोलकांसाठी अन्नसहाय्य निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जामवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत वाडेकर यांनी दिली आहे.
जालना तालुक्यातील जामवाडी, श्रीकृष्णनगर, गुंडेवाडी, तांदुळवाडी, निधोना, धावेडी, पानशेंद्रा, घाणेवाडी आणि माळशेंद्रा येथील गणेश मंडळांनी गावातील पारंपरिक गणपती भंडारा रद्द करून आंदोलकांसाठी अन्नपाण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक घरातून तयार केलेला स्वयंपाक आयशरद्वारे मुंबईतील आझाद मैदानावर पाठवला जाणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर लाखो मराठा बांधव आंदोलन करत आहेत. त्यांना अन्न-पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे गावात भंडारा न करता, प्रत्येक घरातून चपाती, भाजी, चटणी आदी तयार करून मुंबईला पाठवूया, असे आवाहन वाढेकर यांनी केले आहे. सोमवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रत्येक गावातील गणेश मंडळाच्या ठिकाणी अन्नधान्य जमा करण्यात आले. त्यानंतर सर्व मंडळांचे प्रतिनिधी एकत्र येतील आणि ठरलेल्या वेळेत आयशर मुंबईकडे रवाना होणार आहेत. जालना तालुक्यातील गावांतील गणेश मंडळांनी हा निर्णय एकमताने घेतला असून, प्रत्येक घरातून चपाती, भाजी, चटणी यासारखे अन्नपदार्थ जमा करण्याचे आवाहन केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून आझाद मैदानावर अनिश्चितकाळ उपोषण सुरू केले असून, मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत १० टक्के आरक्षणाची मागणी केली आहे.
आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडीसह अनेक अडचणी निर्माण झाल्या असून, आंदोलकांना अन्नाची गरज आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समाजबांधवांनी सकाळी १० वाजेपर्यंत आपापल्या गावातील गणेश मंडळाच्या ठिकाणी जे शक्य असेल ते अन्नधान्य जमा करावे, असे आवाहन विश्वजीत वाढेकर यांनी केले आहे.