

Fraud Case: Falling in love on Facebook is expensive; 9.36 lakhs by pretending to lure marriage
जालना, पुढारी वृत्तसेवा फेसबुकवरील ओळख प्रेमात बदलून लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल ९ लाख ३६ हजार ११३ रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना जालना जिल्ह्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी जालन्याच्या सायबर पोलिस ठाण्यात 'राधिका नागरे' नावाच्या बनावट फेसबुक युजर आयडी आणि मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथील रहिवासी असलेले अविनाश बालचंद बच्छिरे (३०) यांचे 'गणेश टायर' नावाचे दुकान आहे. यादरम्यान, ६ जून २०२६ रोजी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर 'Radhika Nagre' या नावाने एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. समोरील व्यक्ती महिला असल्याने फिर्यादीने ती रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली आणि ओळखीचे रूपांतर जवळीकमध्ये झाले.
संबंधित युवतीने आपण अविवाहित असून नाशिक येथे राहत असल्याचे तसेच आपली परिस्थिती अतिशय गरिबीची असल्याचे अविनाश यांना सांगितले. "मला तुमचा स्वभाव खूप आवडला आहे, मी तुमच्याशी लग्न करेन," असे गोड बोलून तिने तरुणाचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर वेगवेगळ्या कारणांसाठी आणि अडीअडचणीचे बहाणे सांगून तिने पैशाची मागणी सुरू केली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने थेट सायबर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
बँक खात्यांमधून विविध टप्प्यांत उकळले पैसे
तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात अडकून आपल्या फोन पे मोबाईल क्रमांकावरून ६ जून २०२६ ते १३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत वेगवेगळ्या वेळी पैसे पाठवले. यात एचडीएफसी बँक, एसबीआय बँक आणि बंधन बँक या खात्यांमधून वेगवेगळ्या ट्रान्झेंक्शनद्वारे तब्बल ९ लाख ३६ हजार रुपयांहून अधिक रक्कम त्या ठगाच्या खात्यात वर्ग करण्यात आली.