

Former MLA Chandrakant Danve criticizes Congress
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा :
भाजपासोबत खरी युती कुणाची हे भोकरदनच्या जनतेला चांगलेच माहिती आहे. यापुढे काँग्रेसला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा पवित्रा माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांनी घेतला. या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका माध्यमासमोर मांडली. दरम्यान, भोकरदन शहरात नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आले असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाबाबत चुकीचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी चांगलाच समाचार घेतला.
भोकरदन मध्ये अनागोंदी कारभार चालू आहे. काँग्रेसचे खासदार डॉ. काळे यांच्या कानावर टाकूनही त्यांनी एक चकार शब्दही काढला नाही. यामुळे काँग्रेस व भाजपाची छुपी युती असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. आम्ही आघाडीसाठी तयार होतो मात्र नगराध्यक्ष पदासाठी मुळ ओबीसी महिला उमेदवारास आघाडीच्या वतीने संधी द्यावी अशी विनंती आम्ही काँग्रेस पक्षाकडे केली होती. मात्र काँग्रेसने पक्ष एका कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता उचित विचार केला असता तर आघाडी झाली असती. परंतु नगराध्यक्ष पदाच्या हट्टामुळे काँग्रेसने आघाडी तोडली. असा आर ोपही त्यांनी यावेळी केला.
२०२२ पासुन भोकरदन शहरावर व नगरपरिषदेवर प्रशासक राज आहे. दानवे पिता पुत्रांनी मर्जितील अधिकारी आणुन भाजपाच्या कार्यालयातुन नगरपरिषदेचे कामकाज करण्यात येत आहे. शहरातील नागरीकांना रस्ते, पाणी, वीज, नाली, स्वच्छता अशा गंभीर समस्या असतांना देखील त्यांनी जनतेचा विचार न करता नगरपरिषदेचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागास हस्तांतरीत करून गैरवापर केला असल्याचा आरोप त्यांनी केला.
२०१७ पासून काँग्रेस सत्तेत
२०१७ पासून काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी नगरपरिषदेचा ९ कोटी रूपयांचा निधी त्यांच्या पत्नी मंजुषा देशमुख या नगराध्यक्षा असताना कुणाच्या दडपणाखाली किंवा कोणत्या समजुतदार पणाने सार्वजनिक बांधकाम विभागास हस्तांतरीत केला. असा सवाल उपस्थित करण्यात आला.