Ghansawangi Agriculture : पावसाअभावी चारा करपला; पशुधन जगविण्याचे मोठे संकट !

पिके करपली, बांधावरील हिरवळ गायब; चारा-पाण्यासाठी पशुपालकांची धावपळ
Ghansawangi Agriculture
Ghansawangi Agriculture : पावसाअभावी चारा करपला; पशुधन जगविण्याचे मोठे संकट !file photo
Published on: 
Updated on: 

Fodder withered due to lack of rain; a major crisis in keeping livestock alive

अविनाश घोगरे

घनसावंगी : शेतात उभे पीक डोळ्यांसमोर करपत गेले. बांधावरील हिरवळ नाहीशी झाली. विहिरींची पाणीपातळी तळाला पोहोचली आणि आता गोठ्यातील जनावरांच्या तोंडचा घासही संपत चालला आहे! पावसाने पाठ फिरवल्याने घनसावंगी तालुक्यात दुष्काळाची झळ आता थेट पशुधनापर्यंत पोहोचली असून, 'शेतकरी जगणार कसा?' या प्रश्नानंतर 'जनावरे जगवायची कशी?' असी समस्या पशुपालकांसमोर उभी राहिली आहे.

Ghansawangi Agriculture
Jalna News : कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या सात गोवंशीय जनावरांची सुटका

पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या गोठ्यात मात्र चाऱ्याची चिंता वाढली आहे. जून-जुलैमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने चारा पिकांची वाढ खुंटली. त्यानंतर पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने शेतातील गवत करपले, बांधावरील हिरवळ जळून गेली आणि नैसर्गिक चाऱ्याचे स्रोत आटले. त्यामुळे जनावरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी पशुपालकांना आता विकतचा कडबा, वाळलेले गवत आणि अन्य चाऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

पिकातून उत्पन्न नाही आणि गोठ्यात चारा नाही, अशा कोंडीत शेतकरी सापडला आहे. हातात पैसा नसताना रोजचा चारा विकत घेण्याची वेळ आल्याने पशुपालकांच्या घरखर्चाचे गणित कोलमडले आहे. घरातील संसार चालवायचा की गोठ्यातील पशुधन वाचवायचे, असा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर उभा राहिला आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी जनावरे म्हणजे केवळ पशुधन नाही, तर त्यांच्या संसाराचा आधार आहेत. दुभत्या जनावरांच्या दुधातून घरखर्चाला हातभार लागतो. मात्र, चारा टंचाईमुळे जनावरांना पुरेसा आहार मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे. चाऱ्याचा खर्च वाढत असताना दूध उत्पादन घटल्यास पशुपालकांवर आर्थिक संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे.

Ghansawangi Agriculture
Pankaja Munde : पिण्याचे पाणी, चारा नियोजनाला प्राधान्य द्या

आगामी काळात पावसाने आणखी ओढ दिल्यास तालुक्यातील चारा टंचाई गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने 5 पिकांच्या नुकसानीचा आढावा न घेता गावनिहाय चारा व पाण्याची उपलब्धता तपासून पशुधनासाठी तातडीची व्यवस्था करणे गरजेचे आहे. गरजू पशुपालकांना करून देण्याची गरज आहे.

जनावरांना आम्ही लेकरांसारखे सांभाळतो; पण सध्या त्यांच्यासाठी चारा आणणेच मोठे संकट झाले आहे. शेतात गवत नाही, बांधावर हिरवळ नाही आणि घरात साठवलेला कडबाही संपत आला आहे. पाण्यासाठीही भटकंती करावी लागत आहे. शेतीतून उत्पन्न नाही आणि जनावरांच्या चाऱ्यावर रोज खर्च होत आहे. अशा परिस्थितीत पशुधन कसे टिकवायचे, हा प्रश्न सतावत आहे. शासनाने तातडीने चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी.
अशोक निवदे, शेतकरी, म. चिंचोली

चाऱ्यासोबत पाण्याचीही वणवण

चाऱ्याचा प्रश्न गंभीर असतानाच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्याही तीव्र होत आहे. पावसाअभावी नैसर्गिक जलस्रोत आटत चालले असून, काही भागांत जनावरांना पाणी पाजण्यासाठी दूरवर जावे लागत आहे. त्यामुळे पशुपालकांना चारा आणि पाणी या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news