

Final decisive agitation from August 29: Jarange
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : आता मी जाईल नाही तर सरकार असे स्पष्ट करीत हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावीत या व अन्य मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून निर्णायक आणि शेवटचे आंदोलन करण्याचा इशारा बुधवारी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये दिला.
ते म्हणाले की आपल्या आरक्षणाच्या लढ्यातील हक्काचे आणि शेवटचे आंदोलन ठरेल, त्यामुळे संपूर्ण समाजाने मला शब्द द्यावा की २९ ऑगस्टला एकही मराठा समाज बांधव घरामध्ये राहणार नाही. यादिवशी मराठ्यांच्या लढ्याला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. हैदराबाद गॅझेट आणि सगे सोयरे कायद्यानुसार जात प्रमाणपत्र हातात घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी जरांगे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
हैदराबाद गॅझेटमध्ये स्पष्ट नोंदी आहेत तर मराठा समाजाला प्रमाणपत्रे देण्यास विलंब का होतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सोबतच राज्यातील सर्वपक्षीय मराठा समाजातील नेत्यांनी पक्षाच्या दावणीला बांधले जाणे बंद करावे, पक्षाचे राजकारण बाजूला करून आरक्षणाच्या मुद्द्यावर केवळ आणि केवळ स्वतःच्या जातीच्या बाजूने उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. २८ ऑगस्टपर्यंत कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया पूर्ण व्हावी, तसे न झाल्यास २९ पासून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचा भडका उडेल, या आंदोलनाची नेमकी रूपरेषा काय असेल हे आगामी दिवसात जाहीर केले जाईल, असे ते म्हणाले.
समाजाला वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. आपल्या ५८ लाख नोंदी राज्यात सापडल्या आहेत. या नोंदीप्रमाणे प्रमाणपत्र मिळत नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून आंदोलने सुरू आहेत. आता हे शेवटचे आंदोलन करायचे आहे. एक तर ते जातील नाहीतर मी जाईल, असे वक्तव्य त्यांनी केले. सातारा संस्थान, कोल्हापूर, औंध, पुणे, गॅझेटियर लागू करण्याची मागणी केली आहे. त्याची अंमलबजावणी होत नाही. मराठा आंदोलकावरील गुन्हे अजूनही मागे घेतले जात नाहीत. ओबीसींच्या सर्व सुविधा मराठ्यांना लागू केलेल्या नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
चर्चेतून तोडगा काढू : मुख्यमंत्री
मराठा आरक्षणासाठी कुणबी जात प्रमाणपत्रांच्या मागणीवरून जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुती सरकारने मराठा समाजाच्या हितासाठी जे ऐतिहासिक निर्णय घेतले, ते यापूर्वी कोणत्याही सरकारने घेतले नव्हते. तथापि, जरांगे यांच्या मनात अजूनही काही शंका किंवा सरकारबद्दल रोष असेल, तर आम्ही त्यावर चर्चेतून नक्कीच योग्य मार्ग काढू.