

Female Passenger's Jewelry Stolen While Boarding a Moving Bus
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना येथील मुख्य बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोराने एका महिलेच्या पर्सची चेन उघडून सोन्याचे मनी-मंगळसूत्र, चांदीचे कडे आणि रोख रक्कम असा एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, वरखेडी (ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रहिवासी रवीना समाधान जाधव (२४) या १५ मे रोजी दुपारी वाटूर फाटा येथे जाण्यासाठी जालना बसस्थानकात आल्या होत्या. दुपारी १:३० वाजेच्या सुमारास बसस्थानकावर नांदेड बस आली असता, बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली. रवीना गर्दीतून बसमध्ये जाऊन बसल्या आणि त्यांनी आपली पर्स तपासली असता पर्सची चैन उघडी दिसली.
पर्समधील १५ हजार रुपयांचे सोन्याचे मनी-मंगळसूत्र, ५ हजार रुपयांचे पेंडल, ५ हजार रुपयांची सोन्याची बोरमाळ, ३ हजार रुपयांचे चांदीचे कडे आणि २ हजार रुपये रोख असा एकूण ३० हजार रुपयांचा ऐवज गर्दीचा फायदा घेत कोणीतरी चोरट्यांनी पर्स मधून काढून घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. लागलीच त्यांनी सदर बाजार पोलिस ठाणे गाठून आपली फिर्याद नोंदवली. अज्ञात चोराविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसस्टँड परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट
जालना बसस्थानक परिसरात रात्रीच्या वेळी चोरट्यांचा सुळसुळाट वाढत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून वारंवार केल्या जात आहेत. परिसरात दारुड्यांसह नशेखोरांची वर्दळ वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवून बसस्टँड परिसरात कडक कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.