वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची सहनशीलता सरकारने पाहू नये. शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील पिकांचे अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले आहे. पण शेतकऱ्यांनी काळजी करू नये. नुकसान भरपाई सरकारच्या छाताडावर बसून घेऊ, असे आश्वासन मराठा आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांनी दिले. (Manoj Jarange-Patil)
घनसावंगी तालुक्यातील बानेगाव शेवता, रामसगाव येथे अतिवृष्टीने नुकसान ग्रस्त पिकांची पाहणी त्यांनी आज (दि.४) केली. त्यानंतर ते शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते. (Manoj Jarange-Patil)
ते पुढे म्हणाले की, निसर्गाने शेतकऱ्यांशी दगा फटका केला आहे. परंतु, सरकारने दगा करू नये. सरकारने जर शेतकऱ्यांना वेठीस धरले, तर आम्ही सरकारचा कार्यक्रम लावल्याशिवाय थांबणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक झालीच पाहिजे, नाहीतर हा संघर्ष थांबणार नाही. (Manoj Jarange-Patil)
अतिवृष्टी होऊन तीन दिवस झाले तरी ही पालकमंत्री पाहणीसाठी आलेले नाहीत. आढावा बैठक घेतलेली नाही, असे उपस्थित शेतकऱ्यांनी जरांगे यांना सांगितले. यावर जरांगे यांनी जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्यावर हल्ला चढवला. पालकमंत्री कोण आहे हे जनतेला माहीत नाहीत. ते पालकमंत्री गिरीश महाजन यांचे हस्तक असून जातीयवादी असल्याचा आरोप जरांगे यांनी यावेळी केला. यावेळी जरांगे यांनी थेट बांधावरुनच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी फोनवरून संवाद साधत तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली.
घनसावंगी तालुक्यातील बानेगाव येथील शेतकरी शिवाजी शिंदे यांचा गोदावरी नदीच्या पाण्यात पाय घसरून मृत्यू झाला होता. आज जरांगे यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.