मुख्यमंत्री कोणीही असो, निर्णय फडणवीसच घेतात : मनोज जरांगे

बैठक घेऊन ठरविणार निवडणुकीचा निर्णय
Manoj  Jarange
मनोज जरांगे Pudhari News Network
Published on
Updated on

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय सरकारमधील पानही हलत नाही. मुख्यमंत्री कोणीही असो, निर्णय फडणवीसच घेतात, असा आरोप मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत केला. भीमाशंकरचे दर्शन घेण्यासाठी ते पुणे जिल्ह्यात आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आरक्षणाबाबत राज्य सरकारबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. जरांगे म्हणाले की, माझ्याकडे आलेल्या 8 ते 10 आमदारांना देवेंद्र फडणवीस यांना जाऊन आरक्षण द्यायला सांगा, असे म्हटले होते. ते सागर बंगल्यावर गेले आणि परत आलेच नाहीत.

देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर काहीतरी जादू करतात, अशी टीका त्यांनी या वेळी केली. राज्यातील नेतेमंडळी आंतरवलीत येऊन फुकट चहा पिऊन जातात. पण, मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. फडणवीसांच्या जवळचे मला येऊन गुपचूप भेटतात. फडणवीसांची तक्रार करतात. निवडणूक लढविण्याची वेळ आली तर मी सगळे उघडे करेन. देवेंद्र फडणवीस खुनशी आणि मराठाद्वेषी आहेत. त्यामुळे सगेसोयरेचा निर्णय होत नाही. देवेंद्र फडणवीस आमचा शत्रू नाही. पण, मराठाद्वेशी आणि वागण्याची पद्धत विचित्र आहे. मराठवाड्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. पण, मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.

21 विधानसभा मतदारसंघांची चाचपणी

निवडणूक लढविण्याबाबत पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांबाबत त्या-त्या मतदारसंघांतील कार्यकर्त्यांशी चर्चा झाली आहे. प्रत्येक मतदारसंघातील मराठा समाजाची मतदारसंख्या, प्रत्येक कार्यकर्त्याचे सामाजिक काम आणि इतर माहितीचा डेटा एकत्र केला आहे. पण, निर्णय कोणताही झाला नाही. पुन्हा याबाबत एकदा बैठक घेऊ आणि मग ठरवू की, निवडणूक लढवायची की 288 पाडायचे. मराठा समाज निवडणुकीत सनाट चालणार आहे. आम्ही रणनीती उघड करणार नाही, नाहीतर देवेंद्र फडणवीस डाव करतील. दहशतीने निवडणूक जिंकता येत नाही, तर मायेनं जिंकता येणार असल्याचे जरांगे यांनी या वेळी सांगितले.

‘माझ्यावर खोटा खटला दाखल’

माझ्यावर खोटा खटला दाखल केला. मराठवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ठिकठिकाणी पोहचावा, यासाठी आम्ही नाटक आणले होते. त्यात तोटा आला. आम्ही आमच्या परीने पैसे दिले. जबाबदारी वाटून घेतली. पण, माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी खोटा खटला दाखल केल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news