

आन्वा ः गेल्या काही वर्षापासून रासायनिक खतांच्या किमती सातत्याने वाढत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. यंदाही खतांच्या दरात झालेल्या लक्षणीय वाढीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
आगामी रब्बी हंगामाचे नियोजन करताना खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ जुळविणे अवघड झाले आहे. अशी व्यथा परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. सध्याच्या शेती पद्धतीत उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर अपरिहार्य झाला आहे. ही गरज लक्षात घेता शासनाकडून अनुदान दिले जात असले तरी प्रत्यक्षात बाजारात खतांच्या किमती दरवर्षी वाढताना दिसत आहेत.
परिणामी शेतकऱ्यांवर उत्पादन खर्चाचा मोठा बजा पडत असून त्याचा परिणाम शेती अर्थकारणावर होत आहेत. रब्बी हंगामाच्या तोंडावरच खतांच्या किमती वाढत्या गोणीमागे 210 ते 250 रुपयांची वाढ झाल्याचे शेतकरी सांगतात. खतांच्या जुन्या व नव्या दरांमध्ये मोठी तफावत असून सुरू होत असलेल्या रब्बी हंगामात या दरवाढीचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
खतांबरोबरच कीटकनाशकांच्या किमतीही वाढत असल्याने एकूण उत्पादन खचांत लक्षणीय भर पडत आहे. एकीकडे शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसताना दुसरीकडे निविष्ठांच्या किमती सात्याने वाढत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
हमीभाव मिळावा
खरीप हंगामात सोयाबीन, कापूस काही प्रमाणात उत्पन्न निघाल्यावर बाजारात त्याला समाधानकारक दर मिळालेला नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी सोयाबीन व कापूस खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागला अशी परिस्थिती निर्माण झाली आहेत. खतांच्या दरवादीचा फटका थांबविण्यासाठी तसेच शेतमालाला हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहेत.