

आन्वा : स्वच्छ भारत..स्वच्छ शहर’चा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासनाकडून आवाहन करण्यात येते. गाव आणि शहर स्वच्छतेवर मोठा भर देण्यात येत असला तरी भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार गावाची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न एैेरणीवर आला आहे.
गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बऱ्याच ठिकाणी गटारे तुंबल्याने परिसरातील रस्त्यावर घाण कचरा टाकण्यात येत असून दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावरुन ओसंडून वाहत आहे. ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात स्वच्छ भारत अभियान तीनतेरा वाजले आहे.
गावात अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्या आहेत. विविध भागात अगोदरच दैनंदिन साफसफाई अभावी नेहमीच दुर्गंधी पसरलेली असताना नाल्यातील तुंबलेल्या घाण पाण्याची यात भर पडली आहे. गल्लीतल्या रस्त्यावरही गटारीचे घाण पाणी वाहत असून सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे.
गावात मोठी बाजार पेठ असल्याने या ठिकाणी नेहमीच नागरीकांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत गावातील प्रवेशाच्या मुख्य रस्त्यावरच गटारीचे पाणी वाहत असल्याने दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
संताप व्यक्त
ग्रामपंचायत अधिकारी या विभागात फिरकत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. प्रभागातील नागरी समस्या काय आहेत हे जाणून घेण्याची त्यांनी कधी तसदी घेतलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न आहे. ग्रामपंचायतीकडे स्वच्छतेबाबत तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे.