

Farmers start work for Rabi season
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. परतीच्या पावसामुळे मका, सोयाबीन तसेच कापूस पिके हातची गेली. यामुळे बळीराजाचे पार कंबरडे मोडले आहे. तरीही बळीराजा हार न मानता पुन्हा उमेदीने रब्बी हंगामासाठी सज्ज झाला आहे.
जमीन मोकळी करण्यापासून पिकांची पेरणी खतभरणी, बियाण्याची निवड आदी कामात शेतकरी व्यस्त आहे. खरिपाने मारले, आता रब्बी तरी तारेल का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांना फक्त पावसाचा धक्का नाही. तर रोगराई हवामानातील अनियमितता आणि वाढलेल्या खर्चाची समस्याही भेडसावत आहे. मोठे नुकसान झाल्याने हंगाम तर आला नाही उलट मशागतीचा खर्चही निघाला नाही.
तरीही बळीराजाने घाबरून न जाता मेहनत सुरू ठेवली आहे. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असताना तसेच हातातोंडाशी घास आलेला असताना सुरुवातीला अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या अवकाळीने खरिपात मोठे नुकसान केले. मात्र अवकाळीमुळे पाण्याचे स्रोत तुडुंब भरल्याने रब्बीत या नुकसानीची भर निघेल, अशी आशा आहे.
या संकटातून पुढील पोटापाण्यासाठी रब्बी पिकांची तयारी सुरू आहे. शेतकरी पुन्हा कंबर कसून जमिनीत रब्बी हंगामासाठी धान्य पेरतोय; ब्वी हंगाम तरी शेतकऱ्यांना दिलासा देईल का? असा शेतकऱ्यांना प्रश्न आहे. निसर्गाच्या अनियमिततेमुळे प्रत्येक पावसाच्या थेंबासोबत शेतकऱ्याची चिता वाढत आहे.
तरीही पुढील हंगामात काही तरी उत्पादन मिळेल, या आशेवर शेतकरी मेहनत करत आहे. परतीच्या पावसामुळे शेतीतील मातीमध्ये ओलसरपणा जास्त आहे. ज्यामुळे जास्त पाणी लागणारी पिके करण्याचा गरज कमी होते. हरभरा कमी पाण्यावरही चांगले उत्पन्न देते, त्यामुळे कोरडवाहू भागातील शेतकरीही या पिकाकडे आकर्षित होत आहेत.
तसेच, हरभरा पिकाला बाजार भाव सुद्धा चांगला असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. यंदा हवामान आणि आर्थिक दोन्ही बाबींचा विचार करता हरभरा पिकासाठी अधिक प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता दिसून येत आहे. सध्या परतीच्या पावसाने उसंत घेतली असली तरी हा हंगाम तरी चांगला जावा, अशी अपेक्षा शेतकरीवर्ग करीत आहे.
खरिपात निसर्गाने टाकली शेतकऱ्यांच्या ताटात माती
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसामुळे कापूस, मका, सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काही कापूस घरात पोहोचला तरी त्याची किंमत कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठे झाले. मका अजून शेतात पडून असल्यामुळे कोंब फुटल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च आणि हाती आलेले उत्पन्न यामध्ये तफावत झाली आहे.