

Excessive use of mobile phones is killing the 'Potraj' tradition
पारध, पुढारी वृत्तसेवा : एकेकाळी गावागावांत देवभक्ती, श्रद्धा आणि लोक संस्कृतीचा जिवंत वारसा जपण-ारी पोतराज कला आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा झपाट्याने वाढणारा प्रभाव, मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियाचे वाढते आकर्षण आणि बदलती जीवनशैली यामुळे पारंपरिक लोककला हळूहळू काळाच्या पडद्याआड जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पोतराज हा केवळ एक कलाकार नसून तो लोक जीवनातील श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचा वाहक मानला जात असे. देवीच्या नावाचा गजर करत, डोक्यावर कळस, अंगावर घंटा, हातात चाबूक घेऊन गावोगावी फिरत लोकांना धार्मिक संदेश देणारा पोतराज आज उपजीविकेच्या प्रश्नात अडकला आहे.
पूर्वी या कलेला समाजाकडून मान-सन्मान मिळत असे; मात्र सध्याच्या काळात ही कला 'जुनी' ठरवली जात असल्याने नवीन पिढी या कले पासून दूर जात आहे. मोबाईलवरील करमणूक, इंटरनेटवरील व्हिडीओ आणि डिजिटल माध्यमांनी पारंपरिक लोककलांची जागा घेतली आहे. परिणामी पोतराज कलाकारांची संख्या झपाट्याने घटत असून अनेक कलाकारांनी उदरनिर्वाहासाठी मजुरी, शेतमजुरी किंवा अन्य व्यवसाय स्वीकारले आहेत.
काही ठिकाणी ही कला केवळ सण-उत्सवापुरतीच मर्यादित राहिली आहे. लोककला ही समाजाची ओळख असते. पोतराज सारख्या प्राचीन कलेचे जतन व संवर्धन करणे ही केवळ कलाकारांची नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. शासनाने आर्थिक मदत, प्रशिक्षण, व्यासपीठ आणि लोककला महोत्सवांच्या माध्यमातून या कलेला नवे जीवन देण्याची गरज व्यक्त होत आहे. भविष्यात पोतराज कला केवळ पुस्तकां पुरतीच उरेल, अशी भीती सांस्कृतिक अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.