

Everyone should take the initiative to make villages modern pilgrimage sites
जालना, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम केल्यास गावे आधुनिक तीर्थक्षेत्र म्हणून नावरूपास येतील, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी केले. जालना जिल्ह्यातील सावरगाव हडप येथे आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाऊ कदम यांनी दगडवाडी (ता. भोकरदन), सावरगाव हडप व मानेगाव (ता. जालना) तसेच लोणी (ता. परतूर) येथील ग्रामस्थांशी संवाद साधत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतींनी राबविलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
गावांचा विकास करताना स्वच्छता, वृक्षारोपण, शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण यावर विशेष भर दिल्यास गावे आधुनिक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमादरम्यान त्यांनी वृक्षलागवड करून ग्रामस्थांशी संवाद साधत स्थानिक समस्या जाणून घेत शासनाच्या विविध योजनांचा लाभघेण्याचे आवाहन केले.
उपसरपंच विठ्ठल डोंगरे यांनी संचालन करून गावातील विकासकामांची माहिती दिली, तर ग्राम विकास अधिकारी अलका धांडे यांनी अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांचे सादरीकरण केले.
यावेळी प्रभू डोंगरे, विस्तार अधिकारी आर. डी. देशमुख, सूर्यवंशी, पंकज ढाकणे, जनसंपर्क अधिकारी भगवान तायड, अमर डोईफोडे यांच्यासह सरपंच इंदुबाई राऊत, उपसरपंच विठ्ठल भाऊ डोंगरे, शिवा दादा शेजुळ, प्रभाकर डोंगरे, अशोक बिटले, विष्णु शिंदे, दिगंबर शिंदे, सोपान महाराज डोंगरे, कृष्णा दादा डोंगरे, वसंतदादा डोंगरे, माऊली डोंगरे, रेवनाथ पांचाळ यांची उपस्थिती होती.
बैलगाडीतून मिरवणूक
कार्यक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासन व ग्रामपंचायतींनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांची बैलगाडीतून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.