Jalna drought impacts cotton production in Ambad- अंबड तालुक्यात दुष्काळाचा कापूस उत्पादनाला फटका

उत्पन्नात ५० टक्क्यांहून अधिक घट, ४० ट्रकची आवक ७ ते ८ ट्रकवर
Jalna drought impacts cotton production in Ambad
अंबड : अंबड बाजार समितीत दुष्काळामुळे कापसाच्या ट्रकची आवक मंदावली आहे. (छायाः राजेंद्र कळकटे)
Published on: 
Updated on: 

अंबड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात पाठ उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे कापसाच्या उत्पादनात तब्बल ५० टक्क्यांहून अधिक घट झाली असून काही भागांत उत्पादन ७५ टक्क्यांपर्यंत घटल्याचे चित्र आहे. याचा थेट परिणाम कापसाच्या बाजारपेठेवर झाला असून अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची आवक कमालीची मंदावली आहे. दरवर्षी या हंगामात दररोज ४० ट्रक कापूस लोड होत असताना यंदा हे प्रमाण अवघ्या ७ ते ८ ट्रकांवर आले आहे.

यंदा जेमतेम पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला; मात्र ऑगस्ट महिन्यापासून पावसाने पूर्णपणे दडी मारली. त्यामुळे कापसाची वाढ खुंटली आणि पिकांच्या उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम झाला. पावसाअभावी तालुक्यातील परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, सध्या पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. तालुक्यात तब्बल ३८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. अशा परिस्थितीत कापूस पिकाला आवश्यक ओलावा मिळाला नसल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे.

कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने यंदा कापूस वेचणीच्या कामावरही परिणाम झाला आहे. दरवर्षी कापूस वेचणीसाठी मजुरांची मोठी मागणी असते. यंदा मात्र शेतकऱ्यांनी बहुतांश कापूस वेचणी घरच्या घरीच केली आहे. कापूस वेचणीचा दर प्रतिकिलो १० रुपये असतानाही तुरळक ठिकाणीच मजूर लावून वेचणी केली जात आहे. परिणामी, ग्रामीण भागातील मजुरांच्या हातालाही काम मिळेनासे झाले आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट, दुसरीकडे मजुरांच्या हाताला काम नाही आणि बाजार समितीच्या उत्पन्नावरही परिणाम, असे दुष्काळाचे व्यापक चित्र यंदा अंबड तालुक्यात पहायला मिळत आहे.

उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेला कापूसही मर्यादित आहे. कापसाला भाववाढ मिळेल, या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवला आहे. आर्थिक अडचण असलेले शेतकरीच थोडाफार कापूस विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. सध्या कापसाला प्रतिक्विंटल साडेनऊ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. मात्र, अपेक्षित भाव मिळण्याची प्रतीक्षा आहे.

शेतकऱ्यांना भरघोस मदतीची गरज

यावर्षीच्या दुष्काळामुळे शेती व्यवसायात मोठी आर्थिक मंदी असून राज्य शासनाने शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्याची गरज आहे. आपल्या भागातील कापूस हे नगदी पीक असून या पिकाचे उत्पन्न ७५ टक्के घसरल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्य शासनाने आतापर्यंत केवळ पाच हजार रुपये देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली आहे.

- दिनेश काकडे, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख

Jalna drought impacts cotton production in Ambad
जालना बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले

यंदा आवक घटली

कापसाची आवक घटल्याचा फटका अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीलाही बसला आहे. दरवर्षी या हंगामात तालुक्यातून दररोज सरासरी ४० ट्रक कापूस लोड केला जात असे. यंदा मात्र हे प्रमाण घटून केवळ ७ ते ८ ट्रकवर आले आहे. बाजार समितीला मिळणारे मार्केट फी आणि देखरेख शुल्कही कापसाच्या आवकेवर अवलंबून असल्याने उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे. दरवर्षी कापसाच्या व्यवहारातून बाजार समितीला सुमारे ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असे. यंदा मात्र हे उत्पन्न केवळ १५ ते २० लाख रुपयांपर्यंत मर्यादित राहण्याचा अंदाज आहे. बाजार समितीचे सचिव कल्याण चोथे यांनी ही माहिती दिली.

Jalna drought impacts cotton production in Ambad
Chhatrapati Sambhajinagar Bus Accident: छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रॅव्हल्स पुलावरून कोसळली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.