

जालना : जालना शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीत वाढ झाल्याने सुकामेव्याच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने जीएसटी कमी केल्याने यंदा मागील वर्षीच्या तुलनेत सुकामेव्याचे भाव कमी असल्याचे पहावयास मिळत आहे.
वस्तु व सेवा कर दरात कपात झाल्याने अनेक वस्तू स्वस्त झाले आहे. त्यात सुक्या मेव्याचे दरही काहीसे घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सध्या हिवाळ्याचा कडाका वाढताच नागरिक आता सुकामेव्यापासून बनणाऱ्या खाद्यपदार्थांकडे वळू लागले आहेत. बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता आणि खजूर यांसारख्या सुक्या मेव्याला या दिवसांत मोठी मागणी वाढली आहे. अशातच सुक्या मेव्याचे दर घसरले आहे.
जीएसटीचे दर कमी झाले आहेत. यामध्ये ड्रायफ्रूट सुकामेवा वरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के केला आहे. यामुळे खजूर, बदाम, पिस्ता, अंजीर, अक्रोड, जर्दाळू आदी सुकामेवा प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त झाला आहे. जालना शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच किराणा दुकाने आणि ड्राय फ्रूट हाऊस याठिकाणी गेल्या आठवडाभरापासून ग्राहकांची वर्दळ वाढत आहे. बदाम आणि अक्रोडमधील नैसर्गिक फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.
असे आहेत भाव
चारोळी १८०० ते २०००, मनुका ५०० ते ७००, काले मनुका ७०० ते ७५०, बदाम ७७० ते ९००, अंजीर ८०० ते १०००, काजू ८०० ते १४००, गोंडबी १३०० ते १५००, पिस्ता १००० ते १४००, पेंड खेजुर १०० ते ४००, डिंक ५०० ते १०००, खोबरा ३७० ते ४०० रुपये किलो असे भाव आहेत.