

डोणगाव : जाफराबाद तालुक्यातील अगोदरच पावसाने उशिरा हजेरी लावली आहे. त्यात शेतकर्यांनी कशीबशी पेरणी केली. पिके ऐन जोमात असताना पावसाने दडी मारली आहे. यामुळे डोणगाव शिवारात पिके सुकू लागली असून शेतकरी पावसाची वाट पाहत आहे.
जाफराबाद तालुक्यातील डोणगावसह परिसरातील अनेक गावातील शेतकर्यांनी रिमझिम पावसावर खऱिप हंगामातील पेण्यापुर्ण केल्या आहे. शेतकऱ्यांनी उसनवारी करून आणि व्याजाने पैसे काढून खरिपाची लागवड व पेरणी केली आहे. गत चार वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रात बळीराजा अडकला आहे.
या वर्षी तरी निसर्ग अवकृपा दाखवणार नाही अशी आशा होती; मात्र या वर्षीही निसर्गाने आपली अवकृपा सुरूच ठेवली आहे. पावसाअभावी पिके सुकू लागल्याने शेतकऱ्यांचे महागडे बियाणे मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे.
सध्या केवळ ऊन-सावल्यांचा खेळ आणि सोसाट्याचा वारा सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे उगवलेली कोवळी पिके कोमजू लागली आहेत. त्यामुळे डोणगावसह परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे अस्मानी संकट ओढावले असून, बळीराजा पुरता हवालदील झाला आहे.
वीज नाही, पाणी नाही; नदी-नाले कोरडेठाक
अर्धा जुलै महिना उलटून गेला तरी एकही जोरदार पाऊस न झाल्यामुळे डोणगाव परिसरातील नदी-नाले आजही कोरडे ठणठणीत आहेत. एकीकडे पावसाअभावी पिके कोमजत आहे. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
अळीचा प्रादुर्भाव
खरीप हंगामातील पिकांची उशिरा लागवड झाली असून सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, मका, तुर भुईमूग आदीचा पिकांचा समावेश आहे. एकीकडे पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली आहे. तर ढगाळ वातावरणामुळे विविध पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.