

टाकरवण : या वर्षी समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज वर्तवला जात होता. पाऊस चांगला पडेल या आशेने शेतकऱ्यांनी रणरणत्या उन्हात शेतीची मशागत पूर्ण केली. जून महिन्याच्या शेवटी टाकरवणसह परिसरामध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली. खरीप हंगामाची वेळ निघून जाऊ नये म्हणून बळीराजाने या रिमझिम पावसावरच पेरण्या उरकून घेतल्या. सद्यस्थितीत परिसरातील ५० टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
शेतकऱ्यांनी उसनवारी करून आणि व्याजाने पैसे काढून खरिपाची लागवड व पेरणी केली आहे. गत चार वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रात बळीराजा अडकला आहे. या वर्षी तरी निसर्ग अवकृपा दाखवणार नाही अशी आशा होती; मात्र या वर्षीही निसर्गाने आपली अवकृपा सुरूच ठेवली आहे. पावसाअभावी पिके सुकू लागल्याने शेतकऱ्यांचे महागडे बियाणे मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे.
सध्या केवळ ऊन-सावल्यांचा खेळ आणि सोसाट्याचा वारा सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे उगवलेली कोवळी पिके कोमजू लागली आहेत. त्यामुळे टाकरवणसह परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे अस्मानी संकट ओढावले असून, बळीराजा पुरता हवालदील झाला आहे.
चालू आठवड्यात जर पाऊस पडला नाही, तर टाकरवण परिसरातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे. पावसाअभावी कोमजलेली पिके आता वाळू लागली असून शेतात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
या वर्षी खरीप हंगामात उशिरा आलेल्या रिमझिम पावसावरच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे कोवळ्या पिकांवर आता रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे शेतकरी वर्गातील चिंतेचे वातावरण अधिकच वाढले आहे.
संपूर्ण जून महिना उलटून गेला तरी एकही जोरदार पाऊस न झाल्यामुळे टाकरवण परिसरातील नदी-नाले आजही कोरडे ठणठणीत आहेत. एकीकडे पावसाअभावी पिके कोमजत असताना, दुसरीकडे महावितरणकडून होणाऱ्या विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. या दुहेरी संकटामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे हताश झाला आहे.