

Disease outbreaks on sugarcane: Spraying with drones; Fear of impact on production
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवाः घनसावंगी तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांसह ऊस पिकावरही संकटाचे सावट निर्माण झाले आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून, पाण्याच्या ताणामुळे उसाची वाढ खुंटत आहे. त्यातच वातावरणातील बदलामुळे उसावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रोगराईवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी ड्रोनव्दारे फवारणी करीत असल्याने खर्चातही मोठी वाढ होत आहे.
तालुक्यातील अनेक भागांत ऊस पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने उसाला अपेक्षित पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. पाण्याअभावी उसाची पाने पिवळसर पडणे, करपा तसेच इतर रोगांचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
काही ठिकाणी उसाची वाढही अपेक्षित प्रमाणात होत नसल्याने आगामी उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी कीटकनाशके व बुरशीनाशकांची खरेदी करून फवारणी करावी लागत आहे.
औषधांसोबत मजुरी, पाणी आणि फवारणी यंत्राचा खर्चही वाढत असल्याने ऊस उत्पादनाचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाअभावी एकीकडे पिकाला पाण्याची गरज भासत असताना दुसरीकडे रोगराईपासून संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
आधीच वाढत्या शेती निविष्ठांच्या किमतीमुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यात पावसाचा लहरीपणा आणि रोगराईमुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे. पाऊस आणखी लांबल्यास उसाची वाढ मंदावून वजन आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.