

नागज : धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कित्येक वर्षांपासून लढाई सुरू आहे. आरक्षण मिळण्यासाठी धनगर समाज झगडतोय, त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू, न्यायालयीन लढाई लढू, सत्तेत राहून समाजाची भूमिका मांडू, पण धनगर समाजाला ‘एसटी’चे आरक्षण मिळवून देणारच, असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.
आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनात मंगळवारी बहुजनांच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. पडळकर म्हणाले, कायद्याची अंमलबजावणी करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि कायद्याचे पालन करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यानुसार धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळवण्यासाठी गोपीचंद पडळकर काल, आज आणि उद्याही धनगर समाजाच्या बाजूने असेल. आरक्षणाबाबत ज्यावेळी सरकार आणि धनगर यांच्यामध्ये वाद असेल, त्यावेळी मी धनगरांच्या बाजूने असेन. सरकार आणि विरोधक हा विषय असेल, त्यावेळी मी सरकारच्या बाजूने असेन.
ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात महाराष्ट्रातील जातीयवादी कारस्थाने करत असतील तेव्हा पडळकर देवाभाऊंच्या पाठीशी बाजीप्रभू देशपांडेप्रमाणे उभा राहील. ते म्हणाले, ओबीसी समाजामध्ये आपले आरक्षण जाईल, ही भीती निर्माण झाली आहे, ही गोष्ट खरी आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यास आमचा कधीच विरोध नाही, पण ‘मराठा कुणबी’ आणि ‘कुणबी मराठा’ असे बनावट दाखले काढून जो उद्योग सुरू आहे, त्याला आमचा विरोध आहे.‘मराठा कुणबी’ किंवा ‘कुणबी मराठा’ यांना स्वतंत्र प्रवर्ग करून त्यांना 0.25 टक्के आरक्षण दिल्यास मराठा आणि ओबीसी समाजातील वाद मिटेल. शासनाने याबाबत योग्य निर्णय घ्यावा.
यावेळी यु. टी. जाधव, माऊली हळणवर, माजी महापौर नितीन सावगावे, दादासाहेब लवटे, शिवानंद हैबतपुरे, संदीप गिड्डे, दौलत शितोळे यांची भाषणे झाली. रमेश कोळेकर यांनी स्वागत केले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, भाजपाचे जिल्हा चिटणीस सुभाष खांडेकर, बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष काशिलिंग कोळेकर, उपाध्यक्ष जगन्नाथ कोळेकर, सचिव राहुल कोळेकर, रामचंद्र पाटील, रमेश कोळेकर आदी उपस्थित होते.
एकेरी भाषेत जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका
आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली. भाषणाच्या प्रारंभापासून आमदार पाटील यांचा एकेरी उल्लेख त्यांनी केला. ‘मंगळसूत्र चोरी ’ या विषयावर पडळकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन आमदार पाटील यांना लक्ष्य केले. त्यांचे सहकारी दिलीप पाटील यांचा नामोल्लेखही पडळकर यांनी केला नाही; परंतु त्यांच्यावरही खालच्या पातळीवर जाऊन टीकेची झोड उठवली. मला काही जण टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही ते म्हणाले.
जयंत पाटील यांनी जतचा कारखाना ढापला
जयंत पाटील यांनी जतचा कारखाना ढापला, त्याप्रमाणे कवठेमहांकाळचा कारखानाही ढापण्याचा उद्योग चालवला आहे, असा आरोप पडळकर यांनी केला. ‘लव्ह जिहाद’विरोधात तसेच पाद्रीविरोधात मी भूमिका घेतली, त्यावेळी मला बदनाम करण्याचा उद्योग जयंत पाटील यांनी केल्याचे ते म्हणाले. ‘लव्ह जिहाद’ विषयावर राज्यभरात 36 मोर्चे निघाले. हे हिंदूविरोधी आहे, हे ईश्वरपूरच्या लोकांनी हे ध्यानात ठेवायला हवे, असेही पडळकर म्हणाले.