

जाफराबाद: तालुक्यातील आरदखेडा व गोकुळवाडी परिसरातील कथित बोगस घरकुल लाभप्रकरणात पंचायत समिती प्रशासनाने सात दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आदेशाला आता तब्बल एक महिना उलटूनही प्रत्यक्ष चौकशी न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरदखेडा येथील गौतम सुरेश साळवे यांनी पंचायत समितीकडे दिलेल्या तक्रारीत जवखेडा ठेंग येथील दोन रहिवाशांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे आरदखेडा व गोकुळवाडी येथे घरकुल योजनेचा लाभ मिळविल्याचा गंभीर आरोप केला होता. या तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित विस्तार अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळी जाऊन सखोल चौकशी करून सात दिवसांत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले होते.
तसेच अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले होते. मात्र, आदेशानंतर एक महिना उलटूनही ना प्रत्यक्ष पाहणी झाली, ना चौकशी अहवाल सादर करण्यात आला. त्यामुळे संबंधित प्रकरण जाणीवपूर्वक दडपण्याचा प्रयत्न होत आहे का, असा सवाल तक्रारदारांसह नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दोषींवर कारवाईची मागणी
शासनाच्या घरकुल योजनेत पात्र लाभार्थ्यांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या असताना चौकशीच रखडल्याने पंचायत समिती प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन विलंबास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.