

पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे मेथीला भाव नसल्याने दीपक सोनवणे या शेतकऱ्याने एक ते दीड एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या मेथीच्या पिकावर तणनाशक मारले. यामुळे त्याला पन्नास ते साठ हजारांचे नुकसान सहन करावे लागले.
पिंपळगाव रेणुकाई ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे दर मंगळवारी मोठा बाजार भरतो. बाजारासाठी दहा ते बारा गावांतील ग्रामस्थ भाज्यासह इतर खरेदीसाठी येतात. यावर्षी पाऊस चांगला झाला असल्याने विहिरी व बोअरला चांगले पाणी असल्याने शेतकऱ्यांनी पारंपरिक रब्बी पीक घेण्याऐवजी भाजी पिकाला प्राधान्य दिले.
या भागात मंगळवारी भरणाऱ्या बाजारात भाज्यांची मोठी विक्री होत असल्याने शेतकऱ्यांनी मेथी व कोथिंबीर या पिकांची लागवड केली. मात्र गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून मेथी व कोथिंबीरीला भाव नसल्याने शेतकऱ्यांना भाजी तोडणी ते मार्केटपर्यंत आणण्याचा खर्चही निघत नसल्याने त्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत होता. पिंपळगाव रेणुकाई परिसरात अनेक शेतकऱ्यांनी शेकडे हेक्टरवर कोथिंबीर व मेथीची लागवड केली आहे.
मुख्य पीक ओळखल्या जाणारे मिरची पीक लागवड झाल्यानंतर मिरचीच्या शेतात शेतकऱ्याने बहुतांश ठिकाणी कोथिंबीर व मेथीची पेरणी केली आहे. परंतु मेथीला खरेदीदार मिळत नसल्य काही शेतकऱ्यांनी मेथीच्या पिकात जनावरे सोडले तर काहींनी तणनाशकाची फवारणी करून उभी मेथी जाळून टाकली.
दीड एकरवर मेथीची लागवड केली होती. परंतु आठवडी बाजारात मेथीला खरेदीदार मिळत नसल्याने शेतातील मेथी तोडणी व वाहतूक खर्चही निघत नव्हता. त्यामध्ये मेथीच्या उभ्या पिकात तण नाशकाची फवारणी केली .
दीपक सोनवणे, शेतकरी पिंपळगाव रेणुकाई