

Data entry operators went on indefinite strike
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा :
निवडणूक विभागात डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत असणाऱ्या ऑपरेटर्सचे जानेवारी ते मे २०२५ या पाच महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमाराची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर २ जूनपासून डाटा एन्ट्री ऑपरेटर्सनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केल्याने प्रशासनासमोरील अडचणी वाढणार आहेत.
जिल्ह्यातील डाटा एन्ट्री ऑपरेटरचे पाच महिन्यांचे मानधन रखडल्याने ते जमा करण्यात यावे, या मागणीकरिता डाटा एन्ट्री ऑपरेटर संघटनेच्यावतीने २ जूनपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर ऑपरेटर संपावर गेल्याने प्रशासनाला अडचणी सामोरे जावे लागणार आहे.
डाटा एन्ट्री ऑपरेटरनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना जिल्ह्यातील सर्व निवडणूक डाटा एन्ट्री ऑपरेटर जिल्ह्यातील कार्यालयामध्ये मागील १० ते १५ वर्षांपासून कार्यरत आहे. निवडणूक विषयक तसेच वेळवेळी वरिष्ठांनी सांगितलेली कामे ते अहोरात्र प्रामाणिकपणे करतात. दरम्यान शासन निर्णय २० फेब्रुवारी २०१३ नुसार जिल्ह्यातील आठ तालुकास्तरावरील आठ ऑपरेटरची पदे मंजूर असून जिल्ह्यातील आठ तालुक्याला आठ ऑपरेटर कायम ठेवावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
मागील जानेवारी ते मे या पाच महिन्यांचे मानधन थकित असल्याने डाटा ऑपरेटर व त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रखडलेले मानधन देण्यात यावे. यापूर्वी २६ मे रोजी मानधनाबाबत निवेदन देण्यात आले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने जालना जिल्ह्यातील सर्व निवडणूक डॉटा एन्ट्री ऑपरेटर २ जूनपासून नाईलाजाने बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.