

House burglary, three accused arrested at Jalna
जालना, पुढारी वृत्तसेवा :
शहरासह जिल्ह्यात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जेरबंद करीत त्यांच्या ताब्यातून ९३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
येथील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी कर्मचारी घरफोडीतील आरोपींचा शोध घेत असतांना त्यांना खबऱ्याने माहिती दिली की, शहरातील वृंदावन गार्डनच्या पाठीमागे असलेल्या नूतन वसाहत येथील घरफोडी सराईत आरोपी अक्षय राजु शर्मा (रा. नुतनवसाहत, जालना) याने साथीदारांच्या मदतीने केली आहे.
त्यानुषंगाने आरोपी अक्षय राजू शर्मा याच्यासह अविनाश ऊर्फ भैय्या रामभाऊ शेंडगे, (रा. पवळाचीवाडी, ता. गेवराई, जि. बीड), सदेश ऊर्फ चिंग्या गणेश खडके (रा. भारतनगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर) याचा शोध घेऊन त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. यावेळी आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यातील मुद्देमाल ५३ हजार ५०० रुपयांचे सोने, चांदी व देवाचे आभुषणे जप्त करण्यात आली. आरोपी अविनाश ऊर्फ भय्या रामभाऊ शेंडगे याच्या ताब्यातून ४० हजार रुपये किमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप मिळून आला. पुरावे न दिल्याने पोलिसांनी जप्त केला.
छत्रपती संभाजीनगर येथील आरोपी संदेश ऊर्फ चिंग्या गणेश खडके हा पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्नामध्ये तर अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीच्या प्रयत्नामध्ये एक महिन्यापासून फरार होता. आरोपी अविनाश शेंडगे हा तालुका जालना पोलिस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यात फरार होता.