

Crowd of devotees in Mahadev temples across the district
जालना, पुढारी वृत्तसेवा पहिल्याच श्रावण सोमवार निमित्त सोमवारी (दि. २८) रोजी सकाळपासूनच जिल्हाभरातील महादेवाच्या मंदिरात श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. श्रावण मास सुरु झाल्याने शंकराचे भक्त सोमवारीै व्रत वैकल्य करुन महादेवाची भक्तीभावाने पूजा अर्चा करीत असतात. महादेवाच्या मंदिरात भाविकांची मांदियाळी पहावयास मिळाली आहे.
जालना शहरात पहिल्या श्रावण सोमवार निमित्त पंचमुखी महादेव, अमृतेश्वर, मुक्तेश्वर, थाडेश्वर, कुरूदेश्वर महादेव मंदिरात एक धार्मिक वातावरण बघायला मिळाले. पहाटेपासूनच अबाल वृद्धांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी महादेवाला जलाभिषेक घालून पूजा करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हाभरातून विविध महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.
प्रत्येक महादेव मंदिरात हर हर महादेवाचा गजर सुरू होता. या महिन्यात प्रत्येक सोमवारी शिव मंदिरात भगवान भोले शंकराची पूजा-अर्चना केली जाते, तसेच या महिन्यात अनेक सण येत असल्याने नागरिकांची पावले आपसूकच मंदिरांकडे वळतात. पावसाळा सुरू झाला की अनेक जण श्रावण महिन्याची आतरतेने वाट पाहतात. मराठी श्रावण महिना म्हटले की, सर्व महिन्यांचा राजा मानला जातो. श्रावण महिन्यात उपवासाला आणि पुजा-अर्चनेला विशेष महत्त्व असते, या महिन्यात मांसाहार आणि मद्यप्राशन वर्ज्य मानले जाते. प्रत्येक जण श्रावण महिना पाळतो.
आन्वा येथील मंदिरांत गर्दी भोकरदन तालुक्यात आन्वा परिसरातील हेमाडपंती शिवमंदिर, कोदा येथील कोदेश्वर महादेव मंदीर, कुकडी येथील पुरातन कुरकुटेश्वर महादेव मंदीर, जानेफळ गायकवाड, करलावाडी येथील महादेव मंदीरात पहिल्याच श्रावण सोमवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.