

Cricket player dies of heart attack on field
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन येथील पंचायतराज चषक क्रिकेट स्पर्धेत सुरू असलेले डे-नाईट सामना दरम्यान गोलंदाजी करताना एका खेळाडूला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. १६) रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास भोकरदन येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात घडली.
सोमनाथ चंद्रभान बहाद्दुरे (३५, रा. लहानेची वाडी, फुलंब्री) असे या खेळाडूचे नाव आहे. घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ बहादुरे हे भोकरदन येथे खाजगी नोकरी करीत होते.
गेल्या काही दिवसांपासून ते भोकरदन येथेच वास्तवास होते. त्यांना क्रिकेट खेळण्याचा छंद होता. भोकरदन येथे १३ जूनपासून पंचायत चषक २०२५ या हे नाईट क्रिकेट स्पर्धा येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरू आहे. बहाहुरे हे एका संघातर्फे खेळत होते. सोमवारी रात्री त्यांच्या संघाचा सामना होता. ते उत्कृष्ट गोलंदाच होते.
आपल्या संघातर्फे गोलंदाजी करण्यासाठी त्यांनी चेंडू हातात घेतला. गोलंदाजी करत असताना अचानक ते खाली कोसळले. हे पाहून अन्य खेळाडू धावत त्यांच्याजवळ आले. त्यांना उचलून तात्काळ भोकरदन ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे तपासणीत समोर आले.
मयत सोमनाथ बहाद्दुरे यांच्या एक वर्ष वयाच्या मुलीचा सोमवारी पहिला वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने बहाद्दुरे कुटुंबावर बावर दुःखाचा डोंगर कोसळला. तसेच या चिमुकलेचे पितृछत्र हरपले.