

वारणानगर : खेळताना तोल जाऊन पडल्याने स्विमिंग टँकमध्ये बुडून पाच वर्षाच्या शर्विल सुदर्शन पाटील (रा. गणेश पार्क, कोडोली) या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी सातच्या दरम्यान घडली. दीपावलीच्या तोंडावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे वारणा व कोडोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शर्विल हा वडील सुदर्शन पाटील यांच्यासोबत स्विमिंग टँकवर गेला होता. शर्विलला बाजूला कठड्यावर बसवून वडील स्विमिंग टँकमध्ये पोहत होते. कठड्यावर खेळत असताना तोल जाऊन शर्विल टँकमध्ये पडला. त्याच्या वडिलांना काही क्षण हे समजलेच नाही. त्यानी शर्विलचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही वेळाने शर्विल पाण्यात बुडाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पाण्यात तो सापडला. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
शर्विल हा पन्हाळा पंचायत समितीचे निवृत्त तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. पाटील यांचा नातू आहे. तो एकुलता एक असून अंगणवाडी शिक्षण घेत होता. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहा. पोलिस निरीक्षक कैलास कोडग करीत आहेत.