

परतूर ः शेतमालाची खरेदी किमान आधारभूत किंमत प्रमाणेच झाली पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलन कृषी उत्पन्न बाजार समिती परतूर कार्यालयास निवेदन देऊन सुरू करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले की, सध्या सोयाबीन, कापूस यासह इतर शेतमालाची खरेदी शासनाने घोषित केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा 1500 ते 2000 रुपये, तर स्वामीनाथन आयोगाने शिफारस केलेल्या किमतीपेक्षा तब्बल 5000 रुपयांपर्यंत कमी दराने केली जात असल्याचा निवेदनात उल्लेख आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारून त्यांना मान-सन्मानाने जगता यावे यासाठी प्रशासनाने तातडीने पुढील मागण्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या स्थापनेपासून पेक्षा कमी दराने खरेदी होऊ नये यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963, नियम 32 (घ) नुसार केलेल्या उपाययोजनांच्या प्रती सादर कराव्यात. कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या परवानाधारक व्यापाऱ्यांवर केलेल्या कारवाईची लिखित माहिती द्यावी. शेतमाल खरेदी-विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेल्या तपासणी व चौकशी अहवालाची माहिती आणि संबंधित कर्मचाऱ्यांची नावासह यादी सादर करावी. सर्व परवानाधारक व्यापाऱ्यांना कमी दराने खरेदी न करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लेखी आदेश देऊन, त्याचे उल्लंघन केल्यास योग्य ती कारवाई करावी.
या आंदोलनात राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोविंद हिवाळे, श्रावण हिवाळे, शिवकुमार स्वामी, श्याम हिवाळे, दुर्गेश हिवाळे, विकास नाटकर, अशोक साबळे, सुरेश हिवाळे, रमेश हिवाळे, मच्छिंद्र काळे, बाबूराव कापसे, बि.एस.हिवाळे, अशोक पुरुळे, अशोक घुगे, प्रकाश हिवाळे, शंकर रोकडे, बबन साबळे, सुरेश साबळे आदी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
मागण्या पूर्ण करा
राष्ट्रीय किसान मोर्चाने निवेदनावर कृषी उत्पन्न बाजार समितीने गांभीर्याने विचार करून दहा दिवसांच्या आत सर्व मागण्या पूर्ण न केल्यास किंवा लेखी उत्तर न दिल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.