

जालना ः शहरातील राजूर चौफुलीजवळील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते खूपच अरुंद असून ते अत्यंत खराब झालेले असल्यामुळे वाहतुकीसाठी योग्य नाहीत. रस्त्याच्या बाजुला पाणी वाहून जाण्यासाठी दोन मीटर सिमेंट नालीसह साडेसात मीटरचा सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार होणार असल्याची माहीती भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे यांनी दिली.
प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे की, राजूर चौफुली जवळील उड्डाणपुलाखालील दोन्ही बाजूने जाणारे रस्ते केवळ चार मीटरचे आहे. या रस्त्यांचीही अवस्था अत्यंत खराब आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ते वाहतुकी योग्य राहिले नाहीत.त्यामुळे तासन्तास वाहतूक ठप्प होते. वाहनधारक व नागरिकांना याचा खूपच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे यांनी नॅशनल हायवे चे मुख्य अभियंता यांना फोन द्वारे संवाद साधून, रस्त्यावरील अडचणी सांगितल्या आणि सदरील उड्डाणपुला खालील दोन्ही बाजुने जाणारे रस्ते पाणी वाहून जाण्यासाठी दोन मीटरच्या सिमेंट नालीसह साडेसात मीटरचे सिमेंट काँक्रीट रस्ते तयार करून देण्यासाठी सुचना केली. त्यानुसार नॅशनल हायवे चे मुख्य अभियंता यांनी अकोला विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांना या ठिकाणी पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार नॅशनल हायवे चे अकोला विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण व उपअभियंता कचाळे यांनी राजूर चौफुली जवळील उड्डाणपुला जावुन दोन्ही बाजूने जाणाऱ्या रस्त्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत महानगरपालिकाचे तांत्रिक सल्लागार इंजिनियर विष्णू डोंगरे, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे स्वीय सहायक गोवर्धन कोल्हे यांची उपस्थिती होती.
अंदाजपत्रक तयार करून सादर करावे
त्याठिकाणी मार्केट कमिटीपासून 150 ते 200 हेक्टर जमिनीवरील पाणी पावसाळ्यात त्याठिकाणी जमा होत असल्याने ते वाहून जाण्यासाठी दोन्ही बाजूने दोन मीटर सिमेंट नालीसह साडे सात मीटरचा सिमेंट काँक्रीट रस्ता करणे गरजेचे असल्याबाबत त्यांनी नॅशनल हायवेचे मुख्य अभियंता यांना कळविले. त्यानुसार मुख्य अभियंता यांनी तत्काळ अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी सादर करावे, असे निर्देश कार्यकारी अभियंता चव्हाण यांना दिले.