

Businessman sentenced in cheque bounce case
जालना, पुढारी वृत्तसेवा व्यवसायासाठी घेतलेल्या रकमेपोटी परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वट ल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने बांधकाम व्यावसायिक अनुजकुमार सारस्वत यांना एक महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली असून ३ लाख ४० हजार रुपये परत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जुन्या ओळखीचा फायदा घेऊन शारदा गिल्डा यांच्याकडून ०५ मे २०१४ रोजी अनुज सारस्वत यांनी धनादेशाद्वारे २ लाख ५० हजार रुपये रक्कम घेतली होती. ती परतफेड करण्यासाठी १९ ऑक्टोबर २०२० रोजी चिखली अर्बन बँक जालना शाखेचा धनादेश दिला. खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने सदर धनादेश बँकेने नाकारला. यानंतर शारदा गिल्डा यांनी कायदेशीर नोटीस पाठवूनही सारस्वत यांनी रक्कम अदा केली नाही. शेवटी गिल्डा यांनी न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयासमोर वेळोवेळी झालेल्या सुनावणीदरम्यान शारदा गिल्डा यांचे पावर ऑफ अॅटर्नी मनोज गिल्डा, बँकेचे कर्मचारी मनोज गर्जे यांच्या साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, साक्ष पुरावे यांचे अवलोकन करून सर्वोच्च न्यायालयाने आलवी हाजी विरूद्ध पल्लापेट्टी मूहम्मद प्रकरणात दिलेल्या निकालाचा संदर्भ देत अनुजकुमार सारस्वत यांना दोषी ठरवले.
एक महिन्याची साधी कारावासाची शिक्षा आणि घेतलेल्या रकमेपोटी ०३ लाख ४० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य न्यायाधीश करीम खान यांनी दिले आहेत. अॅड. संजय देशपांडे यांनी तक्रारदारांच्या वतीने बाजू मांडली.