Chandgad Crime : हलकर्णी येथे भरदिवसा १३ लाखांचे दागिने लंपास; बनावट चाव्या जागीच टाकून चोरटा फरार

चंदगड पोलिसांत तक्रार दाखल
Chandgad Crime : हलकर्णी येथे भरदिवसा १३ लाखांचे दागिने लंपास; बनावट चाव्या जागीच टाकून चोरटा फरार
pudhari photo
Published on
Updated on

चंदगड : वेंगुर्ला-बेळगाव राज्यमार्गापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हलकर्णी (ता. चंदगड) येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका घरातून चोरट्याने भरदिवसा गृहिणीची नजर चुकवून कपाटातील तब्बल १२ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी बुधवार, २० मे रोजी चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिनाभरापूर्वी घडलेल्या या धाडसी चोरीची नोंद आता झाल्याने हलकर्णी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत प्रकाश कृष्णा सावंत (वय ५२, व्यवसाय: शेती, रा. हलकर्णी) यांनी चंदगड पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी २० मार्च ते १५ एप्रिल या दरम्यानच्या काळात घडली आहे.

नजर चुकवून डल्ला; 'या' दागिन्यांची झाली चोरी

फिर्यादी प्रकाश सावंत यांच्या पत्नी सुषमा या सावंत गल्लीतील आपल्या राहत्या घराच्या पाठीमागे सकाळी गोठ्याची स्वच्छता करून नळाला आलेले पाणी भरत होत्या. याच अल्पशा वेळेत चोरट्याने घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील दागिन्यांवर डल्ला मारला. या चोरीत सुमारे १२ तोळे सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत, ज्यामध्ये पुढील ऐवजाचा समावेश आहे:

सोन्याचे दागिने : २ लाख रुपयांच्या दोन तोळे वजनाच्या सोन्याच्या ८ पुतळ्या, १ लाख २५ हजारांची १८ ग्रॅमची मोहनमाळ, ३ लाख ५० हजारांचे ३४ ग्रॅमचे गंठण, २ लाख ५० हजारांच्या सोन्याच्या दोन चेन, १ लाख ५० हजारांची कर्णफुले व झुबे, आणि मुलांच्या अंगठ्यांसह सुमारे १ लाख ६० हजार रुपयांच्या इतर वेगवेगळ्या सोन्याच्या अंगठ्या.

चांदीचे दागिने : ५ हजार रुपयांचा चांदीचा छल्ला आणि लहान मुलांचे करदोळा, चेन, पैंजण, बिंदल्या, वाळे असे २० हजार रुपयांचे चांदीचे दागिने.

या एकूण दागिन्यांमध्ये सुषमा यांची मुलगी सुकन्या (रा. बागीलगे) हिच्या सव्वा तोळे सोन्याच्या दागिन्यांचा आणि तिच्या लहान मुलाच्या १२ तोळे चांदीच्या दागिन्यांचाही समावेश होता. विशेष म्हणजे, चोरट्याने कपाटातील बॅगेत ठेवलेली रोख रक्कम मात्र तशीच सोडून दिली.

बनावट चाव्या जागीच टाकून पलायन; स्थानिक चोरट्याचा संशय

चोरट्याने कपाट उघडण्यासाठी बनावट चाव्यांचा वापर केला होता आणि चोरी केल्यानंतर त्या बनावट चाव्या कपाटाजवळच टाकून तो पसार झाला. घटनास्थळी सापडलेल्या या चाव्यांवरून चोरटा परिसराची पूर्ण माहिती असलेला स्थानिकच असावा, असा पोलिसांना दाट संशय आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास चंदगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news