

Brazenness of sand mafia on the rise; squad attacked
वडीगोद्री/जालना, पुढारी वृत्तसेवाः जिल्हाभरात वाळूमाफियांवर लगाम लावण्यासाठी महसूल आणि पोलिस प्रशासनाच्यावतीने वारंवार कारवाई होऊन देखील वाळूमाफियांची मुजोरी थांबलेली दिसून येत नाही. अंबड आणि देऊळगाव राजा येथे कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकावर वाळूमाफियांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. हा प्रकार म्हणजे वाळूमाफियांची दादागिरी वाढल्याचा दिसून येत आहे.
पथकाला दरम्यान, अंबड तालुक्यातील गोंदी येथील सिद्धेश्वर पॉइंट परिसरातील गोदावरी नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपशावर धडक कारवाई करण्यासाठी गेलेले तहसीलदार सोमेश मोहिते यांच्यासह त्यांच्या महसूल वाळूमाफियांनी धक्काबुक्की करत बेदम मारहाण केल्याची घटना बुधवार, (दि.२६) रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घडली.
शिवाय, जप्त करण्यात आलेला ५ हायवा आणि ३ लोडर घेवून पसार झाले आहे. गुप्त माहितीच्या आधारे तहसीलदार सोमेश मोहिते यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या पथकासह नदीपात्रात छापा मारला. यावेळी अवैध वाळू भरताना ७ ते ९ छोट्या-मोठ्या हायवा गाड्या ताब्यात घेतल्या. महसूल पथकाची कारवाई सुरू असताना वाळूमाफियांनी तहसीलदार मोहिते यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात आले.
यावेळी महसूल सेवक सोमनाथ सरफळे आणि पपेश बुलबुले यांनी तहसीलदारांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत महसूल सेवक सोमनाथ सरफळे जखमी झाले. तर तहसीलदार मोहिते यांच्याशीही झटापट करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. जप्त केलेल्या काही हायवा पळवून नेल्या. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल गुरले, पोउनि एस. एम. मुपडे आणि जंगले यांनी घटनास्थळी धाव घेतली. गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
तहसीलदारांना मारहाणीचा इतिहास
शहागड येथील गोदापात्रात तत्कालीन तहसीलदार विजय चव्हाण यांच्या अंगावरतील ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बंदुकीतून चार राउंड फायर केले होते. हा प्रकार मे २०२५ रोजी घडला होता. यावेळ दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले होते. शिवाय, तीन वर्षापूर्वी फेब्रुवारी २०२३ मध्ये वाळूमाफियांनी गोंदी व साष्ट पिंपळगाव येथील वाळूसाठा का जप्त केला म्हणत तत्कालीन तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना मारहाण करण्यात आली होती.